पिंपरी | तळेगावकरांची गैरसोय होणार, अधिकारी-कर्मचारी संपावर जाणार

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषदकडून महाराष्ट्र राज्य शासनाचे संवर्ग अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनामार्फत जुनी पेन्शन योजना लागू करणे करीता दिनांक २९ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संवर्ग अधिकारी व कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनात सहभागी होत असलेबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायती मधील सन २००५ नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
तसेच, जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे, दोन्ही कारणास्तव राज्य संवर्गातील जवळपास ३ हजार अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेतील ६० हजार वर कर्मचारी वर्ग यांचेत कमालीचा असंतोष आहे.
वेळोवेळी निवेदन सादर करूनही दुर्लक्ष –
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहे. तसेच, संघटनेमार्फत शासनास, नगरविकास विभागास व नगरपरिषद प्रशासन संचालनालयास वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आलेली आहेत. परंतु, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलभूत समस्या व मागण्या याबाबत शासनामार्फत दुर्लक्ष होत आहे.
प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन
त्यानुषंगाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलभूत समस्या व मागण्या यावर ठोस निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य नगरपरिषद,
नगर पंचायत संवर्ग अधिकारी व कर्मचारी संघटनामार्फत दिनांक २९ ऑगस्ट पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करण्यात येणार असून याबाबतचे निवेदन कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष मुरलीधर टकले यांनी प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना देण्यात आले.
यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, कर निरीक्षक विजय शहाणे, शहर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे, भांडार प्रमुख सिद्धेश्वर महाजन, मिळकत विभाग प्रमुख जयंत मदने,
विद्युत अभियंता श्रुती ठाकरे, संघटनेचे कार्याध्यक्ष प्रविण माने, उपाध्यक्ष भास्कर वाघमारे, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे, सचिव रोहित भोसले, संघटक प्रशांत गायकवाड, सदस्य अरविंद पुंड, मयूर दिलोड, कुणाल आढागळे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.





