Maharashtra Assembly Election 2024 | राज्यातील 288 विधानसभा मतदार संघात आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत बारामती मतदार संघाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत आहे. नुकतेच युगेंद्र पवार यांनी कुटुंबियांसोबत मतदान केले आहे. त्यांचे वडिल, बहिण आणि आई यांच्यासोबत त्यांनी मतदान केले आहे. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, “मला विश्वास आहे की बारामतीची जनता शरद पवारांना विसरणार नाही आणि आम्हाला आशीर्वाद देईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. युगेंद्र पवार जिंकण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मोठी मेहनत घेतली आहे. जोरदार प्रचार आणि सभांचे आयोजनही मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी बारामतीची जनता मला विजयी करेल, बारामतीची जनता याचा विचार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बारामतीत युगेंद्र पवारांना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा मोठा पाठिंबा आहे. तर अजित पवार आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा बारामतीकर कोणाला कौल देणार हे पाहावे लागणार आहे. हेही वाचा: “लोकशाहीत मतदान करणे हे नागरिकांचे कर्तव्य” ; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मतदारांना आवाहन