पिंपरी | चिखली घरकुलच्या प्रलंबित प्रश्न अखेर लागले मार्गी

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली घरकूल येथील पायाभूत सोयी-सुविधा आणि समस्यांबाबत महानगरपालिका प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. घरकूलची सीमाभिंत, ड्रेनेज व स्ट्रॉमवॉटर लाईनचे काम सुरू झाले असून, लवकरच काम पूर्ण करण्यात येईल, असा दावा प्रशासनाने केले आहे.
चिखली घरकुलच्या समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीमध्ये घरकुल प्रतिनिधी व पदाधिकार्यांची नुकतीच बैठक घेतली होती.
त्यावेळी नागरीकांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी सूचना केली होती. अखेर प्रशासनाने काम सुरू केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरकुलवासीयांना दिलासा मिळाला आहे.
चिखली से. 17/19 नेवाळे वस्ती या ठिकाणी 6 हजार 720 घरांची निर्मिती करण्याची योजना आणली आहे. 2014 मध्ये या प्रकल्पातील लाभार्थींना घरांचे वाटप करण्यात आले. मुख्य रस्त्यापेक्षा सखल भागात घरकुल प्रकल्प उभारला आहे.
परिणामी, पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या, ड्रनेज समस्या यासह पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यात अनेक अडचणी आहेत.
याशिवाय प्रकल्पाच्या ‘डिझाईन’प्रमाणे सोयी-सुविधा विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे घरकुलच्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
घरकुलमधील समस्यांबाबत अशोक मगर यांनी बुधवारी घरकुलच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले होते.
यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यांनी त्यांची भेट घेतली आणि या प्रश्नाबाबत तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आयुक्त कार्यालयात बैठक झाली होती.
महापालिका प्रशासनाने ड्रेनेज लाईन नवीन टाकण्याचे काम सुरू केले आहे. सीमाभिंत बांधणी सुरू झाली आहे. तसेच, आता शेतकर्यांच्या माध्यमातून भाजी मंडई सुरू करण्यात येईल. सांस्कृतिक भवन निवडणूक कार्यालयाच्या ताब्यात आहे.
निवडणुकीनंतर ते घरकुलवासीयांसाठी खुले करण्यात येईल. पुढच्या वर्षी घरकुलमध्ये पावळ्यात पाणी साचणार नाही. याप्रमाणे ‘अॅक्शन प्लॅन’ करण्यात येईल. तसेच, घरकुल वासीयांच्या 10 वर्षांच्या टॅक्स माफीबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
चिखली घरकूल प्रकल्पाला तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे काही समस्या वर्षांनुवर्षे रखडलेल्या आहेत. घरकूल येथील शिष्टमंडळासोबत आयुक्त व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली होती.
त्यानुसार, प्रशासनाने कामाला सुरूवात केली. आगामी काळात घरकुलच्या समस्या कालबद्ध नियोजन करून मार्गी लावण्याबाबत पुढाकार घेणार आहे. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा





