Pimpri : भूमी अभिलेखसाठी पुण्याच्या चकरा थांबणार

पिंपरी : शहरातील १९ गावांतील जमिनींचे रेकॉर्ड पिंपरी चिंचवड नगरभूमापन कार्यालय व येरवडा येथील हवेली भूमी अभिलेख कार्यालय अशा दोन कार्यालयांत विभागले आहे. त्यामुळे नागरिकांना नगर भूमापनासंर्भातील कामांसाठी पुण्यात चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, या चकरा आता थांबणार असून ही गावे पिंपरी चिंचवड नगरभूमापन कार्यालयाशी संलग्न करण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमाबंदी आयुक्तांना निर्देश दिले आहेत. याबाबत दैनिक प्रभात ने देखील सातत्याने बातम्या प्रकाशित करत या समस्येवर प्रकाश टाकला होता. आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसावाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावांतील काही भाग पिंपरी चिंचवड नगर भूमापन कार्यालय व हवेली भूमी अभिलेख कार्यालयात विभागालेला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना जवळचे कार्यालयाऐवजी येरवडा येथे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होत आहे.
नागरिकांची गैरसोय लक्षात घेता महापालिका हद्दीतील सर्वच गावे नगरभूमापन कार्यालयात समावेश करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. पूर्वी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचे क्षेत्र लोकसंख्या कमी असल्याने सोयीचे होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. या दोनही कार्यालयाच्या कामकाजात सुसूत्रता आणणे आवश्यक होते. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी देखील पाठपुरावा केला होता.
नगर भूमापन कार्यालयात ही कामे चालतात
नगर भूमापन कार्यालयातून प्रॉपर्टी कार्ड, शेत जमिनीची मोजणी, जमिनीचे नकाशे, भू-संपादनाची मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचे निर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मोजणी, खरेदी विक्री, वारसा वाटणी नोंदी, आकार फोड आदींसह त्या संदर्भातील दाखले, नमुने देण्याचे काम केले जाते. महापालिका हद्दीतील गावे हवेली भूमी अभिलेख कार्यालयातून पिंपरी चिंचवड नगर भूमापन कार्यालयात समाविष्ठ करावीत, यासाठी २०१८-१९ साली जमाबंदी कार्यालयाकडून शासनाला प्रस्ताव पाठण्यात आला होता.





