“एका अजातशत्रूचं निघून जाणं…”

अजितदादांच्या जयंतीनिमित्त प्रभातने हा विशेषांक प्रकाशित करून दादांचे स्मरण केलं आहे. यानिमित्त मलाही त्यांच्या काही आठवणी प्रभातच्या वाचकांसमोर मांडण्याची संधी मिळाली. काटेवाडी आणि बारामतीमध्ये एका शेतकरी कुटुंबात लहानपण गेलेल्या अजितदादांनी राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणातही आपला प्रभाव कसा टाकला ही नव्या राजकीय पिढीसाठी एक सक्सेस स्टोरी आहे असं मला वाटतं.
दादा आपल्यातून निघून गेले त्याला आता सहा महिने पूर्ण झाले, पण तरीही ते आपल्यामध्ये नाहीत यावर विश्वास बसत नाही. त्यांची आठवण येते तेव्हा वाटतं की राजकारणातलं एक अजातशत्रू व्यक्तिमत्व आपल्यातून फार लवकर गेलं. आज दादांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्राताई यांनी स्वतःचं अतीव दुःख बाजूला सारत ज्या पद्धतीनं घर आणि कारभाराची धुरा सांभाळली आहे, ते पाहता दादांचा समृद्ध राजकीय वसा त्या अत्यंत समर्थपणे पुढे नेत आहेत, असंच म्हणावं लागेल.
मला आठवतं, मी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर आमचे संबंध अधिक दृढ झाले, कारण माझ्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अतिशय महत्वाची खाती सांभाळत होते. वयानं आणि राजकीय अनुभवानं दादा माझ्यापेक्षा ज्येष्ठ होते. त्यांची अचाट कार्यपद्धती, स्पष्टवक्ता व दिलखुलास स्वभाव, अवघड विषय सहजतेने समजून घेण्याचे कसब आणि कामाप्रती असलेली कमालीची निष्ठा यामुळं आम्हा सर्वांच्याच मनात त्यांच्याबद्दल कमालीचा आदर होता.
दादांचं व्यक्तिमत्त्व एखाद्या फणसासारखे होतं. बाहेरून खडबडीत आणि काटेरी वाटले, तरी आतून मात्र ते अत्यंत मृदू, प्रेमळ आणि अथांग गोडव्याने भरलेले होते. याच स्वभावामुळे ते कधी कोणावर डाफरले किंवा रागावले, तरीही लोक त्यांच्या बोलण्याचा कधी राग मानत नसत, उलट ते कौतुकाने गोड मानून घेत. जाहीर कार्यक्रमांमध्ये ते कोणाचीही थट्टा-मस्करी करत, पण त्यामागे कोणाचाही अवमान होणार नाही याची विशेष काळजी त्यांची शैली घेत असे. म्हणूनच, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना खऱ्या अर्थाने अजातशत्रू म्हटले गेले.
त्यांच्या शिस्तप्रियतेचा एक किस्सा मला आजही अगदी स्पष्ट आठवतो. गेल्या वर्षी जेव्हा समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले, तेव्हा आम्ही सर्वजण आमणे येथे उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्र आलो होतो. जाताना मी स्वतः कार चालवत होतो, तर परतीच्या प्रवासात देवेंद्रजी ड्रायव्हिंग सीटवर होते. मात्र, या संपूर्ण प्रवासात आम्ही गाडीचा वेग मर्यादेबाहेर तर नेत नाही ना, यावर मागच्या सीटवर बसलेल्या दादांची करडी नजर होती. माझी मागची सीट ठरलेली आहे, असे मिश्किल उद्गार काढून त्यांनी त्या प्रवासात सर्वांचे निखळ मनोरंजन केले होते.
दादांच्या घड्याळ चिन्हाप्रमाणेच त्यांची स्वतःची दिनचर्याही अगदी अचूक असायची. पहाटे ५ वाजल्यापासून त्यांचे काम सुरू व्हायचे. मी अनेकदा गमतीने म्हणायचो की आम्ही तिघेही म्हणजे मी, देवेंद्रजी आणि अजितदादा कामाच्या बाबतीत प्रचंड वेडे आहोत. दादा पहाटेपासून सक्रिय असायचे, देवेंद्रजी दिवसभर कार्यरत राहायचे, तर माझ्या कामाचा जोर दुपारनंतर अधिक वाढायचा. कामाच्या या वेगवेगळ्या वेळांमध्येही सामान्य जनतेच्या हितासाठी तडजोड न करण्याचा एक समान धागा आम्हा तिघांना बांधून ठेवायचा.
महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी काहीतरी ठोस आणि दीर्घकालीन करावे, असा विचार माझ्या मनात घोळत होता आणि त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. जेव्हा मी ही संकल्पना माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्यासमोर मांडली, तेव्हा अजितदादांनी केवळ तिचे स्वागतच केले नाही, तर अर्थमंत्री म्हणून या योजनेसाठी आवश्यक निधीची उपलब्धता आणि ती सातत्याने कशी सुरू राहील, याचे चोख नियोजन अवघ्या काही दिवसांत तयार केलं.
महायुती सरकारच्या काळात सामाजिक कल्याणाच्या योजना असोत किंवा पायाभूत विकासाचे मोठे प्रकल्प, अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी कधीही निधीसाठी आखडता हात घेतला नाही. कोणतीही नवीन संकल्पना समोर आल्यावर ती व्यावहारिकदृष्ट्या किती योग्य आहे आणि तिचा थेट फायदा तळागाळातील माणसाला कसा होईल, याचा ते अत्यंत सखोल अभ्यास करायचे. तरुणांना आणि नवख्या आमदारांना ते प्रसंगी रागावत खरे, पण त्यामागे त्यांना एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून घडवण्याची प्रामाणिक तळमळ असायची.
जलसंपदा विभागाचे आणि धरणांचे वर्षानुवर्षे रखडलेले अनेक प्रस्ताव आमच्या सरकारने सुधारित मान्यतेसह निधी वाढवून मंजूर केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत असे विषय आले की दादा संबंधित सचिवांना थेट आणि स्पष्ट शब्दात बजावायचे, आता या प्रकल्पासाठी पुरेसा निधी देत आहोत, काम ठरलेल्या वेळेतच पूर्ण झाले पाहिजे. जर एखादा प्रस्ताव अत्यंत क्लिष्ट असेल, तर ते सचिवांना थांबवून स्वतः साध्या-सोप्या भाषेत त्याचा सारांश इतर मंत्र्यांना समजावून सांगायचे, ज्यामुळे सर्व शंकांचे निरसन व्हायचे.
त्यांना लोकांमध्ये वावरणे, प्रसंगी त्यांच्यावर रागावणे, त्यांची कानउघाडणी करणे आणि चांगल्या कामाची भरभरून पावती देणे मनापासून आवडायचे. त्यांची कार्यक्षमता थक्क करणारी होती. हातातील फाईल अवघ्या काही सेकंदांत स्कॅन करून त्यातील त्रुटी किंवा चुका अचूक पकडणे आणि त्याबद्दल सचिवांना निर्देश देणे, हे त्यांचे कौशल्य अप्रतिम होते. सहकार, कृषी, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि जलसंपदा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास होता.
त्यांची आणखी एक गोष्ट मला नेहमी आवडायची. ते खूप स्वच्छताप्रिय होते, बैठकीच्या ठिकाणी पडलेला साधा कागदाचा कपटाही त्यांना सहन होत नसे. कोविडच्या अत्यंत बिकट काळातही मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात स्वतः ठाण मांडून अधिकाऱ्यांना अविरत मार्गदर्शन करणारे दादा आजही डोळ्यांसमोर उभे राहतात.
अजितदादा हे केवळ एका पक्षापुरते मर्यादित नेते नव्हते, तर महायुती सरकारमधील एक मजबूत संतुलन केंद्र होते. राजकारणात तीव्र मतभेद किंवा कटुता वाढत असतानाही त्यांनी संयम, सुसंवाद आणि सर्वसमावेशकतेचा मार्ग कधीही सोडला नाही. वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध टिकवून ठेवण्याची मर्यादा त्यांनी कधी ओलांडली नाही. त्यांनी धाडसी निर्णय घेतले, तर विरोधी पक्षात असताना जनसामान्यांचे प्रश्न हिरिरीने मांडले. जवळपास एक वर्षभर ते माझ्यासमोर विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते; त्यांनी आमच्यावर टीका जरूर केली, पण त्या टीकेत कधीही कटुता आणली नाही. जनहितासाठी प्रसंगी त्यांनी स्वतःच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनाही फटकारण्यास मागेपुढे पाहिले नाही.
अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, ज्या संकटांमुळे कोणताही सामान्य माणूस खचून गेला असता, पण दादांनी प्रत्येक संकटावर खंबीरपणे मात केली. ७ वेळा आमदार, ६ वेळा उपमुख्यमंत्री, ११ वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आणि १ वर्षाचे विरोधी पक्षनेतेपद अशी त्यांची देदीप्यमान कारकीर्द नव्या पिढीसाठी एक आदर्श पाठ आहे. मुख्यमंत्री होण्याची इच्छा असणे यात काही गैर नाही, आणि दादांनी कधीही ही भावना लपवून ठेवली नाही. त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असे दुटप्पी वागणे कधीच नव्हते.
लोकांशी त्यांची नाळ थेट जोडलेली होती. शेतकऱ्यांचे दुःख, मजुरांची वेदना आणि तरुणांची अस्वस्थता त्यांनी कधी कागदावर नाही, तर लोकांमध्ये राहून प्रत्यक्ष अनुभवली होती. म्हणूनच त्यांच्या बोलण्यामध्ये थेट जनतेच्या हृदयाला भिडणारी ताकद होती. जे काम शक्य आहे त्याला थेट ‘हो’ म्हणणे आणि जे अशक्य आहे त्याला स्पष्ट ‘नाही’ सांगणे हा त्यांचा बाणा होता. म्हणूनच, त्यांनी नकार दिला तरी लोकांना त्याचा कधीही राग येत नसे.
अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम नावावर असूनही ते नेहमी पाय जमिनीवर ठेवून जगले. स्वतःची चूक कबूल करण्याचा मोठा दिलदारपणा त्यांच्यात होता. राजकारणातील खेळाडूवृत्ती जपत त्यांनी विरोधकांवर नेहमीच खुसखुशीत आणि मार्मिक भाषेत टीका केली, पण टीकेची पातळी कधीही घसरू दिली नाही.
कोणत्याही अर्थमंत्र्याला निधीच्या वाटपावरून नेहमीच टीकेचा धनी व्हावे लागते, पण दादांकडे ही तारेवरची कसरत लीलया पेलण्याची एक विशिष्ट हातोटी होती. ते अतिशय सफाईदारपणे समोरच्याचे समाधान करायचे, पण कधीही पोकळ आश्वासने द्यायचे नाहीत. जे प्रत्यक्ष करून दाखवणे शक्य आहे, तेच ते बोलायचे आणि त्यांची हीच वृत्ती मला सर्वाधिक प्रभावित करून गेली.
आपत्ती किंवा मोठे संकट आले तरी दादांना कधीही निराश किंवा नकारात्मक बोलताना मी पाहिले नाही; त्यांनी नेहमीच सकारात्मक मार्ग दाखवून योग्य तो सल्ला दिला. अशा या लोकनेत्याची, विकासाच्या वाटेवर अविरत चालणाऱ्या कामाच्या आणि आपल्या माणसाची उणीव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात नेहमीच जाणवत राहील.
एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य




