पुणे जिल्हा | होळकर तलावाकाठचे उद्यान लवकरच खुले होणार

जेजुरी, (वार्ताहर) – श्री खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील ऐतिहासिक होळकर तलावाकाठी निर्माण करण्यात येत असलेल्या उद्यानाच्या विकास कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून सुमारे दीड कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच हे उद्यान नागरिकांसाठी खुले होईल,असे जेजुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले.
जेजुरी नगरपालिकेत गेली दोन वर्षे निवडणूक न झाल्याने प्रशासकीय व्यवस्थापन आहे; मात्र जेजुरीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे वीणा सोनवणे यांनी सांगितले. ऐतिहासिक होळकर तलावा नजीक उद्यानाचे काम सुरू असून या उद्यानात जॉगिंग ट्रॅक, पेव्हींग ब्लॉक व इतर कामांसाठी दीड कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून या टेंडर काढण्यात आले आहे. तसेच जेजुरी विद्यानगर, जुनी जेजुरी परिसरात रस्ते व गटारासाठी एक कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याचे वीणा सोनवणे यांनी सांगितले.
गेल्या सहा वर्षांच्या काळात अनेक विकासाची कामे झाली. सध्या साडेतीनशे कोटी रुपये खर्चाचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, 7 कोटी रुपये खर्चाचे जेजुरी विश्राम धाम, 4 कोटी रुपये खर्चाचे मल्हार नाट्यगृह, बंगाळी पटांगणात स्वच्छतागृह ही कामे सुरू आहेत .तर शहरातील मुख्य रस्ते, गटारे, स्ट्रीट लाइट, भाजी मंडई, जुने पालखी मैदानाचे सुशोभीकरण आदी विकास कामे पूर्ण झाली आहेत.
तसेच पाणीटंचाई टाळण्यासाठी मांडकी डोहावरील नादुरुस्त पाणी योजना दुरुस्त करून ही योजना सुरू करण्यात आली आहे असे वीणा सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सचिन सोनवणे, महेश दरेकर, गणेश शिंदे, रुक्मिणी जगताप, सुशील राऊत, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.





