Pimpri | उद्यानात आडोशाला चाळे करणार्यांचे सत्र थांबेना

पिंपळे गुरव : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान म्हणजेच डायनासोर गार्डनमध्ये चाळे करणार्यांचे सत्र थांबता थांबेना. याकडे महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी डोळे झाक करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
येथील उद्यानात शाळा, कॉलेज, महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तासन्तास आडोशाला बसून चाळे करीत असल्याचे दिसून येत आहे.सांगवी पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाच्या (महिला छेडछाड पथक) महिला पोलिसांकडून आडोशाला बसून चाळे करणार्यांवर बडगा उगारताना दिसून आले. मात्र कालांतराने पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे. सकाळी अकरानंतर उद्यानात येणार्यांची काहीच गर्दी नसते, क्वचितच नागरिक येत असतात. याचा फायदा घेऊन अल्पवयीन मुले, मुली चाळे करण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी येथील उद्यानात प्रवेश करीत आहेत.
सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक सातत्याने पेट्रोलिंग करीत असताना उद्यानात जात असतात. यावेळी असे चाळे करणारे निदर्शनास पडल्यास वेळीच कार्यवाही करण्यात येत असते. अनेकदा उद्यान प्रेमींकडून देखील फोन येत असतात यावेळी मार्शल पाठवून त्याठिकाणी वेळोवेळी कार्यवाही करण्यात येते, अशी माहिती सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश बनसोड यांनी दिली.





