आदेश निघाला, पण मार्गदर्शक तत्वेच नाहीत; विद्यार्थिनिंना मोफत शिक्षणाबाबत संभ्रम

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्क संपूर्णत: माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी दिले. मात्र, या संदर्भात राज्य सरकाकडून मार्गदर्शक तत्वे अथवा लेखी परिपत्रक अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे प्रवेश शुल्काबाबत महाविद्यालयांमध्ये संभ्रमावस्था आहे.
मोफत शिक्षणाबाबत शासनाच्या अध्यादेशाची प्रत घेऊन पालक महाविद्यालांमध्ये चौकशीला जात आहेत. त्यावरून पालक आणि महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादाची स्थिती उद्भवत आहे. त्यामुळे प्रवेशाचा संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने तत्काळ या निर्णयाची कार्यपद्धती जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.
राज्य सरकारने व्यावसायिक शिक्षण मोफत देण्याचे निर्णयाचे स्वागत आहे. या संदर्भात महाविद्यालय व संस्थांकडे विचारणा केली असताना मोफत मुलींच्या शिक्षणाबाबत तंत्रशिक्षण विभाग अथवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून काहीच परिपत्रक निघाले नाही. त्यामुळे कोणत्या आधारावर मुलींना प्रवेश द्यायचा, असाही प्रश्न महाविद्यालयांपुढे पडला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुलींना मोफत शिक्षण देण्यासंदर्भात नेमकी कार्यपद्धत काय असणार आहे, याविषयी महाविद्यालयेही अनभिज्ञ आहेत. त्यांच्याकडून उच्च शिक्षण विभागाशी संपर्क साधण्यात येत आहे. मात्र, त्यांनाही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
पालकांना पडलेले प्रश्न..
– पूर्ण शुल्क माफ होणार, की शैक्षणिक शुल्क ?
– प्रवेश घेतानाच शुल्क द्यावे लागणार का ?
– प्रवेश शुल्क आधी भरल्यास नंतर ते परत मिळणार का ?
– एकापेक्षा जास्त वर्षासाठीचा अभ्यासक्रम असल्यास माफी होणार का ?
– यंदाचे अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष असल्यास भरलेले शुल्क परत मिळणार का ?
– कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती शुल्क माफ होणार ?
–
महाविद्यालयांंना पडलेले प्रश्न
– प्रवेश शुल्क कसे आकारायचे ?
– शुल्क आकारण्याची नियमावली काय ?
– शासन कशा प्रकारे प्रतीपूर्ती करणार ?
– कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती शुल्क माफी होणार ?
– प्रवेशावेळी शुल्क आकारायचे की नाही ?
– चालू वर्षासाठी शुल्क आकारलेले असल्यास परत द्यायचे का ?
माझी मुलगी आता अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. त्यासाठी महाविद्यालयाकडून शिक्षण शुल्क भरण्याचा तगादा सुरू आहे. त्यामुळे फक्त पहिल्याच वर्षी प्रवेश घेणाऱ्या मुलींनाच शुल्क माफ होणार आहे, की अभियांत्रिकीच्या सर्व वर्षातील मुलींचे शुल्क माफ केले जाणार आहे? याविषयी महाविद्यालयांकडून शासनाची नियमावली आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आमची अडचण झाली आहे. – एक पालक





