Delimitation Bill 2026 : विरोधकांची मोर्चेबांधणी सुरु.! खरगे, सोनिया, राहुल, ममता आणि स्टॅलिन शरद पवारांच्या भेटीला
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या शिष्टमंडळात सहभागी असतील.

Delimitation Bill 2026 – संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षणविषयक घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या विधेयकाविरोधात संख्याबळ जमवण्यासाठी आघाडीतील प्रमुख नेत्यांचे एक शिष्टमंडळ रविवारी चेन्नईत द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या शिष्टमंडळात सहभागी असतील.
त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीसन आणि तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे देखील असणार आहेत. मुंबईतील बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात ‘१३२ वे घटनादुरुस्ती विधेयक, २०२६’ सादर करणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे, तर २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे कामकाज सुरू होणार असून ३ डिसेंबरला या विशेष अधिवेशनाची सांगता होईल.
सोमवारी लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या या नव्या विधेयकाद्वारे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभा तसेच विधानसभांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करून महिलांसाठी एक तृतीयांश आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव आहे.
यानुसार लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० (राज्यांमधून ८१५ आणि केंद्रशासित प्रदेशांतून ३५) तर विधानसभांची कमाल मर्यादा ५०० वरून ६५० करण्याचे प्रस्तावित असून, ही सुधारित रचना २०५१ पर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.
या विधेयकाला द्रमुकने पाठिंबा जाहीर केला असून शरद पवार यांचा पक्षही या विधेयकाचे समर्थन करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने शनिवारी या विधेयकाला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय घेतला.
हे विधेयक अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींच्या (एसटी) हिताला बाधा पोहोचवणारे असून, देशातील लोकशाही संपवून कायमस्वरूपी सत्ता काबीज करण्याचा हा भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी :
८५०- लोकसभेची प्रस्तावित कमाल सदस्यसंख्या
८१५ – सदस्य घटक राज्यांमधून
३५ – सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून
६५०- विधानसभांची कमाल सदस्यसंख्या
• लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश आरक्षण
• मतदारसंघांची पुनर्रचना आणि नव्या सीमा २०५१ पर्यंत कायम ठेवण्याचा प्रस्ताव
द्रमुक , ‘वायएसआरसीपी’ च्या शिष्टमंडळाकडून शहांची भेट :
प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकांवर संसदेत होणाऱ्या चर्चेच्या आधी, द्रमुक आणि वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोन्ही पक्षांनी केंद्र सरकारच्या या प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे
अमित शहा यांची भेट घेतलेल्या द्रमुकच्या शिष्टमंडळात टी. आर. बालू, कनिमोझी, दयानिधी मारन, ए. राजा आणि पी. विल्सन या नेत्यांचा समावेश होता, तर वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व राज्यसभा खासदार वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी केले. संसदेत द्रमुकचे लोकसभेत २२ आणि राज्यसभेत ८ खासदार आहेत, तर वायएसआरसीपीचे दोन्ही सभागृहांत प्रत्येकी ४ सदस्य आहेत.






