पुणे | परिवहन विभागाची ऑनलाइन यंत्रणा ठप्प

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आरटीओ विभागाचा सर्व्हर बंद पडणे, ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मात्र, त्यामुळे वेगवेगळ्या कामांसाठी आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असून, मनस्तापही सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे परिवहन विभागाची ऑनलाइन यंत्रणा अक्षरशः ठप्प झाली आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्सबरोबरच इतरही कामे बंद आहेत.
नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून परिवहन विभागाने जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन करण्यावर भर दिला आहे. त्यात अलिकडे आरटीओच्या काही सेवा आरटीओमध्ये न येता (फेसलेस) करण्यावर भर दिला जात आहे; पण अशा कामांना सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने फटका बसत आहे.
नागरिक त्यांची कामे घेऊन मंगळवारी आरटीओ कार्यालयात गेले होते. मंगळवारी (दि. 14) दुपारपासून सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत एकही काम झाले नाही. त्यामुळे नागरिक बुधवारी पुन्हा आरटीओमध्ये गेले. मात्र, बुधवारी देखील सर्व्हर डाऊन होता. त्यामुळे बुधवारी देखील काहीही कामे झाली नाहीत.
सर्व्हर बंद असल्यामुळे ऑनलाइन कामे करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने नवीन लायसन्स काढणे, कर्जाचा बोजा चढवणे- उतरवणे, लायसन्सचे नूतनीकरण, डुप्लिकेट लायसन्स, रिक्षाचे परमिट, वाहन ट्रान्सफरची कामे बंदच पडल्याचे चित्र आहे. परिणामी नागरिकांना विनाकारण आरटीओ विभागाकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत.
नागरिक आरटीओच्या कामासाठी सुटी काढून येतात. मात्र, तेथे गेल्यावर सर्व्हर डाऊन असल्याने कामच होत नसल्याचे लक्षात येते. त्यानंतर नागरिकांची चिडचिड होताना दिसते. आरटीओचे अधिकारी तांत्रिक अडचण येत असल्याने ही सर्वच ठिकाणी ही परिस्थिती असल्याचे सांगतात.
तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी
ऑफीस, कामावर सुटी घेऊन आरटीओमध्ये यावे लागते. इथे आले की सर्व्हर डाऊन असल्याचे समजते आणि पुन्हा नवीन तारीख घेऊन या, असे सांगितले जाते. त्यामुळे वेळ आणि पैसा वाया जात आहे. परिवहन विभागाला ऑनलाइन सेवांमधून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. नागरिकांचाही वेळ वाचतो, त्यामुळे सर्व्हरमधील दुरुस्ती तत्काळ करावी. मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





