Devendra Fadnavis post : “प्रसंग कठीण होता…पण…”; सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर
Devendra Fadnavis post : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis post : महाराष्ट्राच्या राजकारणात कालचा दिवस मोठा ऐतिहासिक ठरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. शनिवारी मुंबईतील लोकभवनात सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“प्रसंग कठीण होता… पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही… पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.” अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत दिली आहे.
प्रसंग कठीण होता…
पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.
शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही…
पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला… pic.twitter.com/qoE9zKF9nZ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 31, 2026
सुनेत्रा पवार यांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. या पदासोबत त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे असलेले नियोजन आणि वित्त खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.
“आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.… pic.twitter.com/Z4vHP0BzkF
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) January 31, 2026
दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.” असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.





