नगर – निवडणुकीच्या आर्थिक बाबींवर सूक्ष्मपणे लक्ष द्या

नगर – निवडणुकीच्या अनुषंगाने होणार्या आर्थिक बाबींवर अत्यंत सूक्ष्मपणे लक्ष द्यावे, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक ताई के यांनी दिले.
नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय शिंदे, नायब तहसीलदार सुधीर उबाळे, अभिजित वांढेकर, अनिल तोरडमल आदी उपस्थित होते.
निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्राँग रूम, एम.सी.सी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, सी.सी.टी.व्ही, आचारसंहिता कक्ष, कंट्रोल रूमची त्यांनी पाहणी केली. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशही त्यांनी दिले. स्ट्राँग रूमच्या सुरक्षेतेबाबत पोलीस पथकास सूचना दिल्या.
ताई के म्हणाले, सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे. विशेषतः प्रचार सभा, मिरवणुका व कार्यक्रमांवर केल्या जाणार्या खर्चावर निगराणीसाठी असलेल्या पथकांनी अत्यंत बारकाईने नोंदी घ्याव्यात. वाहनांची तपासणी अधिक दक्षतापूर्वक करावी. पथकांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रभावीपणे काम करावे. भरारी पथकाच्या अधिकार्यांनी प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवून सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या संपर्कात राहावे, असेही त्यांनी सांगितले.





