मुंबईत पुन्हा बाधितांची संख्या वाढली

मुंबई – राज्यात पुन्हा करोनाचे संकट वाढत आहे. मुंबई शहरात करोनाचे साडेचारशे रुग्ण वाढले आहेत. तर साडेतीनशेच्या आसपास रुग्ण करोनामुक्त झाले. तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या मुंबईत चार हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यातही 300च्या आसपास रुग्णवाढ झाली आहे.
मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 458 नवीन रुग्ण आढळले. तर सहा जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 7 लाख 25 हजार 581 रुग्ण बरे झाले आहेत. करोनामुळे एकूण 16 हजार 10 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी 48 हजार 712 चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 96 लाख 253 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मुंबईतील रुग्णवाढीचा दर 0.06 टक्के आहे तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1206 दिवसांवर पोहोचला आहे.
ठाणे जिल्ह्यात गुरुवारी 286 रुग्ण आढळून आले. तर, तीन जणांचा मृत्यू झाला. ठाण्यात 85, कल्याण-डोंबिवली 67, नवी मुंबई 60, मिरा भाईंदर 30, बदलापूर 19, ठाणे ग्रामीण 11, अंबरनाथ 9, उल्हासनगर 4 आणि भिवंडीमध्ये एक रुग्ण आढळून आला. तिघांचा मृत्यू झाला आहे. यात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.





