Pune District : पाटस टोल प्लाझा वाममार्गाचा अड्डा

पाटस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोल प्लाझा परिसरात रस्त्यावर रात्रीच्या वेळी वेश्या व्यवसायाला ऊत आलेला आहे. पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कारवाई केली जात नसल्याने पाटसकर हैराण झाले आहेत.
पाटस हद्दीतील महामार्गावरील टोल प्लाझा परिसरात मोठया प्रमाणात लोकांची गर्दी असते. टोल परिसरात अनेक वाहन चालक विश्रांतीसाठी थांबा घेतात. याचाच फायदा तृतीयपंथीय घेत अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी खुलेआम हा प्रकार सुरू आहे. या वेश्या व्यवसायाची चर्चा पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात होत आहे. रात्रीच्या वेळी टोल परिसरात अनेकांनी हजेरी लावलेली आहे. यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींची संख्या मोठी आहे. टोल प्लाझा परिसरातील हॉटेल, वाहन चालक यांची लुटालूट केली जात असल्याच्या घटना वाढत आहेत.
विशेषतः कामगारांची, परप्रांतीयांच्या दागिन्यांची तसेच रोकड लुटीचे प्रकार होत आहे. याचा त्रास मार्गांवरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि स्थानिक ग्रामस्थांना होत आहे. कंपनीतील कामगार तसेच काही कर्मचारी लूट झाली तरी पोलीस ठाण्यात बदनामीच्या भीतीने तक्रार करीत नाही, हे भयानक वास्तव असल्याचे कामगारांनी सांगितले. यावर कारवाई व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
टोल प्लाझावर रात्रीच्या वेळी वेश्या व्यवसाय केला जात असल्याने पाटस गावची प्रतिमा मलीन होत आहे. पोलिसांनी त्वरित वेश्या व्यवसायावर कडक कारवाई करून वेश्या व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा.
-स्वप्नील भागवत, ग्रामपंचायत सदस्य, पाटस.





