पिंपरी – शहरातील करोनाच्या रुग्णसंख्येने आज एक लाखाचा टप्पा ओलांडला. शहरात मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर गेल्या 9 महिन्यांच्या कालावधीत एक लाख जणांना करोनाची बाधा झाली. तर आतापर्यंत 96 हजार 444 जण करोनावर मात करून घरी परतले. या कालावधीत तब्बल 2563 जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.
मार्च महिन्यात देशभरावर करोनाचे संकट निर्माण झालेले असतानाच पिंपरी-चिंचवड 13 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर अवघ्या चारच दिवसांत करोनाच्या रुग्णसंख्येत भर पडली होती. मात्र 28 मार्च अखेरीस शहर करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले असतानाच 30 मार्चपासून पुन्हा नव्या रुग्णांची भर पडत गेली. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधी शहरातील रुग्णांची संख्या उच्चांकी पातळीवर होती. त्यानंतर मात्र रुग्णसंख्येत घट झाली आहे. सध्या शहरात शंभरच्या आसपास रोज रुग्ण आढळून येत आहेत.
बुधवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 82 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील एका व्यक्तीचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमधील चारजण शहरातील रहिवासी होते. तर शहराबाहेरील दोघांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1804 वर पोहोचला असून शहराबाहेरील 759 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2563 ची संख्या आज गाठली. आतापर्यंत शहरातील 96 हजार 444 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 7599 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.