भारतात विमानतळांची संख्या वाढणार!

नवी दिल्ली – येथील पीआयबी मुख्यालयातील पत्रकार परिषदेत नागरी विमान खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतातील प्रमुख शहरांमध्ये विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या व्यापक योजनांचा आराखडा जाहीर केला. ते म्हणाले की,आम्ही पहिल्या टप्प्यात देशभरातील ६ मेट्रो शहरांचा विस्तार करण्याचे ठरवले आहे, यात या ६ विमानतळांच्या क्षमता वाढीकडे लक्ष दिले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात १० अतिरिक्त विमानतळे घेतली जातील ज्यांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यात भुवनेश्वर, चंदीगड, गोवा, पाटणा, गुवाहाटी, लखनौ, जयपूर, अहमदाबाद, त्रिवेंद्रम आणि कोची या विमानतळांचा समावेश आहे.
लखनौ, गुवाहाटी आणि पाटणा येथे नवीन टर्मिनल इमारतींच्या आगामी उद्घाटनाची घोषणा मंत्र्यांनी यावेळी केली. शिंदे म्हणाले, जेवर आणि नवी मुंबईतील नवीन विमानतळ ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. .
हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि वाढत्या हवाई वाहतुकीच्या मागणीला सामावून घेण्यासाठी हे विमानतळ सरकारच्या धोरणात्मक दृष्टीकोनाचे महत्त्वाचे घटक आहेत असे ते म्हणाले. या विमानतळांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवानांच्या संख्येत वाढ केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
गेल्या आठ महिन्यांत, सीआरपीएफ जवानांच्या तैनातीत २१ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे असे ते म्हणाले. इमिग्रेशन सेवा कार्यक्षम होण्यासाठी तेथे एक हजार जादा कर्मचारी तैनात केले जातील असे ते म्हणालेे. पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वांचा एक भाग म्हणून, मंत्र्यांनी जागा वापरासाठी महत्त्वपूर्ण मापदंडांची रूपरेषा सांगितली, प्रवाशांच्या प्रक्रियेच्या गरजांना प्राधान्य दिले जाईल याची खात्री केली असे ते म्हणाले.





