पुणे – पुण्यात सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवात रविवार (दि. १४ डिसेंबर २०२५) रोजी कवयित्री व लेखिका रश्मी पदवाड मदनकर यांच्या ‘कायांतर’ या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. साहित्य, पत्रकारिता व संशोधन क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या हस्ते झालेल्या या प्रकाशन सोहळ्याने महोत्सवात विशेष लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, ज्येष्ठ लेखक, वरिष्ठ पत्रकार व संपादक अरूण खोरे, प्रसिद्ध मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार व कीर्तनकार सदानंद मोरे, प्राध्यापक व लेखक प्रकाश पवार तसेच पद्मगंधा प्रकाशनचे संचालक आणि ‘कायांतर’ कादंबरीचे प्रकाशक अभिषेक जाखडे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘कायांतर’ कादंबरीचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. तृतीय पंथी व्यक्तीच्या जीवनप्रवासावर भाष्य करणारी ही कादंबरी खूप काही सांगणारी आहे. लेखिका रश्मी पदवाड मदनकर यांनी आंचल वर्मा या तृतीय पंथी व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित ‘कायांतर’ ही कादंबरी लिहिली आहे. समाजाच्या काठावर ढकलल्या गेलेल्या एका संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा संघर्ष, आत्मशोध आणि परिवर्तनाचा प्रवास या कादंबरीत प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे. यावेळी बोलताना मान्यवर वक्त्यांनी अत्यंत संवेदनशील विषयावरची ही कादंबरी केवळ कथनापुरती मर्यादित न राहता समाजाशी संवाद साधणारी असल्याचे नमूद केले. तृतीय पंथीयांच्या भावविश्वाला शब्दरूप देणारी ही कादंबरी ‘अत्यंत बोलकी’ असून वाचकांना अंतर्मुख करणारी ठरेल, अशी भावना वक्त्यांनी व्यक्त केली. लेखिकेची संवेदनशील मांडणी, आशयघनता आणि भाषेवरील पकड यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले. साहित्यप्रेमी, वाचक आणि अभ्यासकांची मोठी उपस्थिती या प्रकाशन सोहळ्यास लाभली. पुणे पुस्तक महोत्सवातील हा कार्यक्रम समकालीन मराठी साहित्याला सामाजिक जाणिवेची नवी दिशा देणारा ठरला.