पुणे जिल्ह्यातील निमोणे-करडे रस्ता गेला खड्यात

वाहन चालवताना चालकांना करावी लागते कसरत
निमोणे (प्रतिनिधी) – निमोणे-करडे या ९ किमीच्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन नक्की रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता आहे असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. निमोणे हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असुन शिरुर, न्हावरे, आंबळे, गुनाट, शिंदोडी तसेच करडे या ६ गावांना जोडणारे रस्ते निमोणे गावातुन जातात. त्यातला निमोणे-करडे आणि निमोणे-शिरुर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते.
https://www.facebook.com/watch/?v=354288485876706
यावर्षी सलग ५ महिने मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि अवजड वाहतुकीमुळे निमोणे-करडे रस्ता पूर्णपणे उखडला असुन दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना या रस्त्याने जाताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
निमोणे-करडे रस्त्यावर रात्रीच्या वेळेस मोठया प्रमाणात अवजड वाहतूक चालते. या गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोड भरलेला असतो. त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रात्रीच्या वेळेस चालणारी चोरटी वाहतूक एखाद्या प्रवाश्याच्या जीवावर बेतल्यावर महसूल विभाग जागा होणार का…? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.
सध्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असुन सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जाणारे अनेक कामगार याच रस्त्याने कामाला जातात. त्यातील अनेकांना रस्त्यातील खड्यांमुळे पाठीचे व मणक्यांचे विकार उद्भवले आहेत.





