BRICS Summit : पुढील ब्रिक्स परिषद ब्राझीलमध्ये पार पडणार

साओ पावलो, (ब्राझील) : आगामी ब्र्क्स परिषद ब्राझीलमध्ये आयोजित केली जाणार असल्याचे ब्राझील सरकारने शनिवारी जाहीर केले. रिओ डी जनेरिओ येथे दिनांक 6 आणि 7 जुलैला ही परिषद होणार आहे. विकसनशील अर्थसत्तांच्या गटाच्या या परिषदेमध्ये जागतिक प्रशासनातील सुधारणा आणि ग्लोबल साऊथमधील देशांते आपापसातील सहकार्य या मुद्यांवर विशेष भर दिला जाणार आहे.
ब्राझील सरकारकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ब्रिक्स गटाची स्थापना २००९ साली करण्यात आली असून ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश या गटाचे संस्थापक सदस्य आहेत. दक्षिण आफ्रिका या गटामध्ये २०१० साली सामील झाला. दक्षिण आफ्रिकेच्या सहभागामुळे उद्योग प्रधान देशांच्या या गटामध्ये समतोल साधला गेला.
गेल्या वर्षी इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देश या गटामध्ये सामील झाले. सौदी अरेबियालाही यागटामध्ये सामील होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर तुर्कीये, अझरबैजान आणि मलेशिया या देशांनी ब्रिक्स गटामध्ये सामील होण्यासाठी औपचारिकपणे अर्ज केला आहे. तर अन्य काही देशांनीही सदस्यत्वासाठी उत्सुकता दाखवून दिली आहे.
अलिकडेच या गटाचा 11 वा देश म्हणून इंडोनेशिया आणि भागीदार देश म्हणून नायजेरिया ब्रिक्समध्ये सामील झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेट ब्रिक्स ही मृत संघटना असल्याची टीका केली होती आणि या गटावर 100 टक्के आयात शुल्क लावण्याची धमकीही दिली आहे.





