प्रभात वृत्तसेवा मंचर – पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्ग माझ्यासह मतदार संघातील नागरिकांना मान्य नाही. प्रसंगी जनआंदोलन उभारू, असा इशारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, २००४ ला मी खेड लोकसभा मतदारसंघाचा प्रथम खासदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर २००५ पासून चाकण एमआयडीसीमधील कामगारांची, मतदारसंघातील शेतकऱ्यांची, नाशिकवरून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी. यासाठी पुणे नाशिक रेल्वे मार्ग जोडल्यास मोठा लाभ होईल.असा विचार मनात आला व जुन्नर, आंबेगाव, खेड येथील जनतेच्या गरजेपोटी पुणे नाशिक रेल्वे मार्गाची संकल्पना तयार झाली व मी लोकसभेत पुणे – नाशिक रेल्वेची मागणी केली. त्यानुसार माझ्या पाठपुराव्याला २०१२ ला यश आले. पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा सर्वे करण्यात आला. मी स्वतः रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर आठ दिवस सर्वे करत होतो. त्यानंतर सर्वे तयार झाला व तो रेल्वे मंत्रालयात सादर करण्यात आला. मात्र, काही त्रुटी निघाल्यामुळे प्रकल्प मागे ठेवण्यात आला. विद्यमान खासदार यांनी फक्त बैठका घेतल्या. मात्र, पाठपुरावा झाला नाही. मी खासदार पदावरून पायउतार झाल्यानंतर मी मंजूर केलेलेप्रकल्प आहे, त्याच जागेवर राहिले आहेत. गेल्या सहा वर्षात कुठलाही पाठपुरावा झाला नाही. लवकरच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक जन आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जनआंदोलनात सर्वपक्षीय नेते पुढारी हे रद्द झालेला रेल्वे मार्ग आहे. त्याच प्रस्तावित मार्गावरून न्यावा,अशी मागणी करणार असल्याची चर्चा असून याबाबत लवकरच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत खेड,आंबेगाव,जुन्नर तालुक्यातील लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे.