कॅनडाचे नवीन पंतप्रधान ठरणार ९ मार्च रोजी !

टोरांटो – कॅनडातील सत्तारुढ लिबरल पक्षाकडून भावी पंतप्रधानांची घोषणा ९ मार्च रोजी केली जाणार आहे. जस्टिन ट्रुडो यांनी पक्षाच्या नेतेपदाचा आणि पंतप्रधानपदाचा या आठवड्यात राजीनामा दिला आहे.
आता नवीन नेत्याच्या निवडीसाठी पक्षाच्या नेत्यांमध्ये मतदान घेतले जाणार आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी गुरुवारी रात्री उशीरा सांगितले. नवीन नेत्याची निवड केली जाईपर्यंत जस्टिन ट्रुडो हे पंततप्रधानपदी कायम राहणार आहेत, असेही या नेत्यांनी सांगितले.
लिबरल पक्षाच्या नेतेपदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय बँकर मार्क कार्नी आणि माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड हे आघाडीवर आहेत. क्रिस्टिया फ्रीलँड यांनी गेल्याच महिन्यातट्रुडो यांच्याबरोबरच्या मतभेदांमुळे अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशभरात ट्रुडो यांच्याविरोधात असलेल्या असंतोषामुळे लिबरल पार्टीमध्ये नवीन नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मात्र आता याबाबतचा निर्णय ९ मार्च रोजी करण्यात येणार आहे. या वर्षी कॅनडामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवण्याच्या हेतूने या नवीन नेत्याची निवड केली जाणार आहे, असे कॅनडाच्या लिबरल पार्टीचे अध्यक्ष सचित मेहरा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ट्रम्प हे कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हणू लागले आहेत. कॅनडावर २५ टक्के आयात शुल्क लादण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. पार्श्वभुमीवर कॅनडाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यायोग्य नेत्याची निवड महत्वाची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अलिकडे झालेल्या सर्व्हेक्षणामध्ये लिबरल पार्टीच्या विजयाची शक्यता धूसर आहे. लिबरल पार्टीच्या विजयाची शक्यता अवघी २३ टक्के तर कन्झर्वेटिव्हपाक्षाच्या विजयाची शक्यता ४५ टक्के वरतवली जाते आहे.





