Shirur : टाकळी हाजी औटपोस्टच्या नव्या अधिकाऱ्यांसमोर अवैध धंदे अन् चोऱ्यांचे आव्हान
Shirur : दरम्यान, नितीन केनेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बेट भागातील विविध गावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले.

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या टाकळी हाजी औटपोस्टच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी नितीन केनेकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बेट भागातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या, तरी या भागातील अवैध धंदे, वाढत्या चोऱ्या आणि प्रलंबित गुन्ह्यांचा तपास ही त्यांच्यासमोरील मोठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे.
टाकळी हाजी औटपोस्टच्या हद्दीत गावठी दारू विक्री, मटका, जुगार यांसारख्या अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. पंचतळे परिसर तर अवैध धंद्यांचे माहेरघर बनत असल्याचा आरोप होत आहे. या धंद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी आता नव्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांना कायद्याचा धाक दाखविणार की केवळ अधूनमधून कारवाईचा देखावा होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
दुसरीकडे, जांबुत,पिंपरखेड, टाकळी हाजी परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी,केबल वारंवार चोरीला जात आहेत. विद्युत रोहित्रांवरील साहित्याचीही चोरी होत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून उभारलेली शेतीची यंत्रणा चोरट्यांच्या निशाण्यावर असताना या चोऱ्यांना अद्याप प्रभावी आळा बसलेला नाही. चोरट्यांचे मनोबल इतके वाढले आहे की, पोलिसांचा धाकच उरला नाही काय, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. गेल्या आठ महिन्यात एकाही चोरीचा तपास लागलेला नाही.
इतकेच नव्हे, तर परिसरात आढळलेल्या काही बेवारस मृतदेहांच्या तपासाचे गूढही अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. या मृतदेहांची ओळख पटविणे, मृत्यूमागील कारणांचा शोध घेणे आणि संबंधित गुन्ह्यांचा छडा लावणे, हेही नव्या अधिकाऱ्यांसमोरील महत्त्वाचे आव्हान असणार आहे.
दरम्यान, नितीन केनेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बेट भागातील विविध गावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले. जांबुत येथे गावठी दारू विक्रीविरोधात कारवाई केल्याचेही समोर आले आहे. मात्र, एका कारवाईने अवैध धंदे बंद होणार आहेत का? पंचतळे परिसरात हप्ते वसुलीमुळे दिवसाढवळ्या जुगार, मटका, चक्री, गावठी दारु, हे अवैध धंदे जोमात सुरू आहे. केणेकर साहेब तेथे कारवाई करणार का ? कारवाई केलीच तर पुन्हा अवैध धंदे पूर्ववत सुरू होणार का, हा खरा प्रश्न आहे.
बेट भागातील नागरिकांना सत्कार समारंभ नको, तर सुरक्षितता हवी आहे. शेतकऱ्यांना आश्वासने नकोत, तर चोरीला गेलेल्या मोटारींचा तपास आणि चोरट्यांना बेड्या हव्या आहेत. अवैध धंद्यांवर केवळ नाममात्र कारवाई नको, तर त्यांचे समूळ उच्चाटन अपेक्षित आहे. त्यामुळे नितीन केनेकर यांच्या कार्यकाळात अवैध धंदेवाल्यांवर खऱ्या अर्थाने वचक निर्माण होणार, चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागणार आणि प्रलंबित तपासांना गती मिळणार का? की काही दिवसांच्या धडक कारवायांनंतर पुन्हा परिस्थिती ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच राहणार? याकडे संपूर्ण बेट भागाचे लक्ष लागले आहे.





