Satara | माउलींच्या परतीच्या प्रवासातील “नीरा स्नान” संपन्न

लोणंद, (प्रतिनिधी) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील आपला शेवटचा मुक्काम आटोपून शुक्रवार, दि.२६ रोजी सकाळी आठ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना झाला. दरम्यान पाडेगाव मुक्कामानंतर माऊलींचा सोहळा नीरा स्नानासाठी नीरा घट येथे काही काळ थांबला. यावेळेस नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.
परतीच्या प्रवासातील पाडेगाव येथील सातारा जिल्ह्यातील आपला शेवटचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सकाळी आठ वाजता पाडेगाव येथून रवाना झाला. यावेळी पाडेगाव ग्रामस्थांनी माऊलींच्या पादुका असलेली पालखी आपल्या खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात पाडेगाव पाटीपर्यंत नेली. तिथे चांदीच्या रथावर माऊलींच्या पादुका विराजमान होताच सोहळा नीरा स्नानासाठी रवाना झाला.
नीरा नदीवरील पाडेगाव हद्दीतील प्रसिद्ध दत्तघाटाजवळ माऊलींच्या पादुकांना ‘माऊली माऊलींच्या ‘ जयघोषात नीरा स्नान घालण्यात आल्यानंतर आरती होऊन सोहळा पुणे जिल्ह्यातील प्रवासासाठी निरेच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी पादुकांच्या स्पर्श दर्शनावरून विश्वस्त व रथामागील दिंड्यातील वारकऱ्यांच्यात वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नीरा स्नानानंतर प्रथेनुसार रथापुढील २७ दिंड्यातील वीणेकरी व रथामागील जवळपास तीनशेहून अधिक दिंड्यातील वीणेकरी, तसेच डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिला वारकरी हे ओळीने उभे असतात स्नान घातलेल्या पादुका प्रथम रथापुढील वीणेकऱ्याच्यात स्पर्श दर्शनासाठी फिरवण्यात येतात आणि मग रथामागील वीणेकऱ्यांच्यात दर्शनासाठी फिरवून मगच रथामध्ये विराजमान होवून पुढील प्रवास सुरू करतात.
मात्र, आज स्नानानंतर फक्त रथापुढील बाजूस पादुका स्पर्श दर्शन देऊन माउलींच्या पादुका रथामधे ठेवण्यात आल्याने रथामागील दिंड्यातील वीणेकऱ्यांने आक्षेप घेत रथापुढे बसत ठिय्या आंदोलन केले.
यावेळेस जवळपास एक तास रथ रोखून ठेवण्यात आलेला होता. पालखी पादूका दर्शनाचा वाद न मिटल्याने तासाभराच्या विलंबाने रथापुढील दिंड्यातील सोहळ्याचे मालक व विश्वस्तांकडून याबाबत अरेरावीची भूमिका घेत सोहळा तसाच पुढे नेण्यात आला.
परंपरा मोडीत काढल्याचा आरोप
रथामागील दिंड्यातील वीणेकरींनी अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न काहीजण करत असल्याचा आरोप करीत रथासोबत न जाता एक तास उशिराने मार्गक्रमण करणार असल्याची भुमिका घेतली. पालखी सोहळा नीरा येथील विठ्ठल मंदिर परिसरात दुपारच्या विसाव्या घेवून वाल्मिक ऋषींच्या भूमीत वाल्हे या ठिकाणी सायंकाळी मुक्कामास विसावणार आहे.
पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात काल सकाळचा विसावा असलेल्या काळज, तरडगाव, लोणंद व पाडेगाव मुक्कामी आणि आज सकाळचे निरा स्नान होऊन पालखी पुणे जिल्ह्यात पोहचेपर्यंत लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला




