Satara | किसनवीर कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा

लोणंद, (प्रतिनिधी) – सामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाच्या, घामाच्या पैशातुन उभ्या राहीलेल्या खंडाळा कारखान्याच्या जाहिर लिलावाची नोटीस सर्वत्र झळकत आहे. देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मात्र १८ ऑगस्ट ही तारीख काळरात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खंडाळा कारखान्याचा लिलावाच्या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. नितीन सावंत यांनी विद्यमान आमदार तसेच कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
डॉ. नितीन सावंत म्हणाले, आमदार तथा किसनवीर खंडाळा कारखाना समुहाचे चेअरमन असलेल्या मकरंद पाटील यांना आवाहन आहे की, हा कारखाना सामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्यांचा विषय असून हा कारखाना सामान्य शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे ही भूमिका कायमपणे आम्ही मांडली होती, मांडली आहे. मागील संचालक मंडळाकडून हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठी आम्ही आपल्या सोबत कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार केला.
सामान्य सभासद शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेऊन सत्तेत बसविले मात्र आज सभासद शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे थकीत आहेत. खंडाळा तालुका हा दुष्काळी असलेचे जाहीर केला गेला पण शेतकऱ्यांच्या हक्काचे, कष्टाचे, घामाचे पैसे दिले नाहीत.
शैक्षणिक वर्ष चालु झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या मुलांसाठी शाळेचे साहित्य खरेदी करता आली नाही शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचे सांगितले.
मागील वार्षिक सभेमध्ये कारखाना दुसऱ्यांना चालवायला देण्यासाठी सभासदांवर दबाब आणून ठराव मांडला गेला. परंतु आज तो कारखाना खरचं खाजगी भांडवलदारांच्या घशात घातला जात आहे.
त्यामुळे खंडाळा तालुक्यातील सर्व सभासद शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. खंडाळा तालुक्याचा फक्त मतासाठी वापर न करता कारखान्याचा लिलाव ताबडतोब थांबवुन हा कारखाना सामान्य शेतकऱ्यांचा राहावा अशी मागणी सर्व सभासद शेतकऱ्यांकडून होत आहे.
लिलाव कसा होत आहे?
५०० कोटीची थक हमी मिळाल्याच्या बातम्या झळकून एक महिना झाला तरीही सभासद शेतकऱ्यांचे पैसे का थकले आहेत ? कामगारांचे पगार का थकले आहेत ? याचे उत्तर सभासद शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे. कारखान्यासाठी शरद पवारांची साथ सोडली हे सर्वत्र सांगत सत्ताधाऱ्यांबरोबर गेलात; मग थकहमी मिळून सुद्धा आज कारखान्याचा लिलाव कसा होत आहे?





