‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचं वादानंतर नाव बदललं, नवं नाव जाहीर!

मुंबई : मृण्मयी देशपांडे लिखित व दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाला काही संघटनांच्या विरोधामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता. पश्चिम महाराष्ट्रासह काही ठिकाणी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध झाला, तसेच काही ठिकाणी शो बंद पाडण्यात आले. यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आता हा चित्रपट नव्या नावासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तू बोल ना’ या नव्या नावाने हा चित्रपट येत्या गुरुवारी, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘मनाचे श्लोक’ या मूळ नावामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने प्रदर्शनाला परवानगी दिली असतानाही काही संघटनांनी चित्रपटाला विरोध दर्शवला होता. या गोंधळामुळे प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपट नव्या नावासह सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या नावाबाबत निर्मात्यांनी सांगितले, “गेल्या काही दिवसांत आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, रसिक प्रेक्षक, समाजमाध्यमे आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीच्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे आम्हाला नव्या ऊर्जेने पुढे जाण्याचे बळ मिळाले. आता ‘तू बोल ना’ या नव्या नावासह आम्ही हा चित्रपट पुन्हा सादर करत आहोत. प्रेक्षकांना आता कोणत्याही अडथळ्याशिवाय हा चित्रपट पाहता येईल.”
‘तू बोल ना’ या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांसारखी तरुण कलाकारांची तगडी फळी झळकणार आहे. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर यांसारखे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
हा चित्रपट नव्या नावासह आणि नव्या उत्साहाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाच्या कथानकाची आणि कलाकारांच्या अभिनयाची उत्सुकता लागली आहे.


