CNAP : अनोळखी कॉल येताच आता स्क्रीनवर व्यक्तीचे नाव दिसणार; उद्यापासून सुरू होणार CNAP सेवा
CNAP : अज्ञात नंबर ओळखणे सोपे होईल आणि सायबर फसवणुकीला आळा बसणार

CNAP : ‘कॉलर नेम प्रेझेंटेशन’ अर्थात CNAP ही नवी सेवा आता भारतात उद्यापासून सुरू होणार आहे. १ नोव्हेंबरपासून भारतातील लाखो मोबाईल वापरकर्त्यांसाठी नियम बदलणार आहेत.
नव्या नियमांनुसार, आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्मार्टफोन वापरकर्त्यांना अनोळखी कॉलरचे अधिकृत नाव थेट मोबाईल स्क्रीनवर दाखवणे बंधनकारक असणार आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने यासंदर्भात नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या नवीन सेवेअंतर्गत, तुमचा फोन वाजताच तुम्हाला कॉल करणाऱ्याचे खरे आणि नोंदणीकृत नाव आता मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यामुळे अज्ञात नंबर ओळखणे सोपे होईल आणि सायबर फसवणुकीला आळा बसेल.
याद्वारे आता कोणतीही थर्ड-पार्टी ॲप्स न वापरता, सिम कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे तिचे खरे नाव कॉल येताच नागरिकांना दिसणार आहे.
सीएनएपी सेवेअंतर्गत, 4G आणि 5G सेवा वापरणाऱ्या वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर अज्ञात क्रमांकाचे नाव देखील दिसेल. 2G आणि 3G ग्राहकांसाठी येत्या काही दिवसांत स्वतंत्रपणे सेवा सुरू केली जाईल. ही सेवा काही प्रमाणात ट्रू-कॉलर ॲपची आठवण करून देते.
जेव्हा भारतीय मोबाईल वापरकर्त्यांना कॉल येतो, तेव्हा कॉल करणाऱ्याच्या नावाबरोबरच कॉन्टॅक्ट बुकमध्ये सेव्ह केलेल्या व्यक्तीचे नावही स्क्रीनवर दिसते. जर फोन नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट बुकमध्ये सेव्ह केलेला नसेल, तर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणारे कॉलरचे नाव हे टेलिकॉम कंपनीच्या डेटा सर्व्हरमध्ये साठवलेले नाव असते. हेच ते नाव आहे जे सिम कार्ड खरेदी करण्यासाठी वापरले जाते.
आंतरराष्ट्रीय कॉलची माहिती मिळणार
सीएनएपीमुळे भारतीय वापरकर्त्यांना त्यांचा कॉलर भारतातील आहे की परदेशी, हे सहजपणे ठरवता येईल. जर कॉल करणारा आंतरराष्ट्रीय ग्राहक असेल, तर मोबाईलच्या डिस्प्लेवर आंतरराष्ट्रीय कॉल्स असे दिसेल. सायबर गुन्हेगार अनेकदा परदेशातून कॉल करून लोकांना लक्ष्य करतात.
अनेक सायबर गुन्हेगारी टोळ्यांचे परदेशात संबंध असतात. सीएनएपीच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याचे दूरसंचार विभागाचे उद्दिष्ट आहे. सध्या अनेकजण अनोळखी नाव ओळखण्यासाठी Truecaller चा सर्वात जास्त वापर करतात मात्र CNAP हे Truecaller ला टक्कर देणारे ठरणार आहे.
हेही वाचा:





