Pune : “सवाई’त पंचकन्यांची सांगीतिक मोहिनी

पुणे : पाच महिला कलाकारांच्या एकत्रित सादरीकरणाची “मोहिनी’ आणि युवा गायक विराज जोशी यांचा रंगतदार “पूरिया’ यामुळे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीचे पहिले सत्र संगीतमय झाले. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू असून शुक्रवारी तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीचे सत्र वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
गायिका रुचिरा केदार, सतारवादक सहाना बॅनर्जी, तबलावादक सावनी तळवलकर, पखवाज वादक अनुजा बोरुडे शिंदे आणि हार्मोनियम वादक अदिती गराडे या पाच कलावतींनी वैविध्यपूर्ण असा “मोहिनी’ संगीत संवाद एकत्रित गायन- वादनातून सादर केला. “आमच्यामधील कलामैत्रीचे हे संवादपर्व आहे. आपापल्या कला माध्यमातून एकमेकींशी आणि रसिकांशी सांगीतिक संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे,’ असे त्या म्हणाल्या.
युवा गायक विराज जोशी यांनी प्रभावी सादरीकरणातून आपले आजोबा पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाची आठवण करून दिली. किराणा घराण्याचा खास राग मानला जाणारा राग पूरिया विराज यांनी सुव्यवस्थित पद्धतीने पेश केला.
आजोबांनी अजरामर केलेल्या “कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या अभंगाचे गायन करून विराज यांनी अतिशय रंगलेल्या गायनाचा समारोप केला. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विजय मराठे आणि उदय घारे यांनी विराज जोशी यांचा सत्कार केला. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.





