अहमदनगर – वडील आणि भावाचा केला खून किरकोळ वादातून घडला प्रकार; आरोपी अटकेत

श्रीगोंदा – पैशांच्या कारणावरून कुटुंबात होत असलेल्या वादातून जावेद घड्याळ्या चव्हाण (वय ३०) याने वडील घड्याळ्या चव्हाण (वय ५५) व भाऊ महावीर चव्हाण (वय ३८, दोघे रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) या दोघांचा चाकूने वार करीत खून केला. ही घटना गुरुवारी (दि.१८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील सुरेगाव शिवारात घडली. या हल्ल्यात आरोपीची आई रिवोन व भाऊ आक्रोश हे दोघेही जखमी झाले आहेत. याबाबत रिवोन घड्याळ्या चव्हाण यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. बेलवंडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी जावेद व त्याची पत्नी वर्षा यांच्यामध्ये डिसेंबर महिन्यात वाद झाल्याने ती माहेरी निघून गेली होती. त्यावेळी आरोपीच्या सासऱ्याने “हुंड्याचे दहा लाख रुपये दे आणि तुझी बायको घेऊन जा”, असे सांगितले. त्यामुळे आरोपी जावेद बायकोला आणण्यासाठी कुटुंबीयांकडे १० लाख रुपयांची मागणी करीत होता. परंतु, आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही दहा लाख रुपये देऊ शकत नाही, असे कुटुंबीयांनी सांगितल्याने आरोपी जावेद व कुटुंबियांमध्ये वाद होऊ लागले.
गुरुवारी (दि.१८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चव्हाण कुटुंबीय तालुक्यातील सुरेगाव येथील घरासमोर शेकोटीसमोर बसले होते. यावेळी आरोपी जावेद याने तिथे जात “मला माझ्या बायकोला आणायचे आहे, मला दहा लाख रुपये द्या, अशी मागणी कुटुंबीयांकडे करीत पैसे न दिल्यास तुम्हाला मारून टाकीन असे म्हणत शिवीगाळ करीत वडील घड्याळ्या चव्हाण यांच्या छातीवर चाकूने वार केला. वडिलांना वाचविण्यासाठी महावीरमध्ये आल्यानंतर आरोपी जावेद याने त्याच्या गळ्यावर वार केला.
आई रिवोन आणि भाऊ आक्रोश यांनाही चाकूने दुखापत केली. या हल्ल्यात घड्याळ्या चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. तर महावीर चव्हाण याला उपचारासाठी कोळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, बेलवंडी पोलिसांनी आरोपी जावेद चव्हाण याला काही तासांतच घटक केली.





