पुणे | पबविरोधात महापालिकाही आक्रमक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोलिसांपाठोपाठ पबविरोधात आता महापालिकेनेही शड्डू ठोकला आहे. पब्ज, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. बॉलर पबच्या पाहणीसाठी पथकही पाठवण्यात आले होते.
या पुढे पब तसेच हाॅटेलला अनधिकृत बांधकाम प्रकरणात बजावण्यात आलेल्या नोटीसेसवर काय कारवाई करण्यात आली, याचा अहवाल दर महिन्याला स्थायी समितीसमोर ठेवावा लागणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बांधकाम आणि अतिक्रमण निर्मूलन विभागास आदेश दिले आहेत.
महापालिकेने जानेवारी २०२३ मध्ये शहरातील अनधिकृत बांधकामे असलेल्या पब आणि बांधकामांना नोटीस दिल्या होत्या. तसेच पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने महापालिकेनेच दोन वेळा कारवाई केली आहे. त्यानंतर आता पालिका पुन्हा पब विरोधात आक्रमक झाली आहे.
आयुक्त म्हणाले, कल्याणीनगर येथील घटनेशी महापालिकेचा संबध नाही. मात्र, शहराच्या विविध भागांत इमारतीच्या टेरेसवर, तसेच सामाईक जागेत शेड उभे करून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. याबाबत तक्रारीही आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने बांधकाम विकास विभागाची बैठक घेण्यात आली आहे. संबंधित अभियंत्यांना याबाबत सूचना केलेल्या आहेत





