PCMC News – पिंपरी-चिंचवड महापालिकेत बोगस उपसूचनांच्या आधारे सुमारे ५२ कोटी रुपयांची नियमबाह्य देयके अदा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आल्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे दुर्लक्ष करणे सहायक आयुक्त, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला चांगलेच भोवले आहे. सहायक आयुक्ताला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने ई क्षेत्रीय अधिकारी असलेले सहायक आयुक्त तानाजी नरळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नरळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिस्तभंग विषयक कारवाई का करण्यात येऊ नये? याचा लेखी खुलासा तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच कनिष्ठ अभियंता संदीप हजारे यांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हजारे हे स्थापत्य मुख्य कार्यालयात कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवणे, सर्वेक्षण करून अहवाल सादर करणे आणि अनधिकृत बांधकामांना नोटीस देणे त्याच प्रमाणे पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून कारवाई करण्याची जबाबदारी आहे. या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर एक एप्रिल रोजी सर्व साहित्य सामुग्रीसह पोलिस बंदोबस्तमध्ये कारवाईचे नियोजन केले होते. मात्र, कारवाईच्या आदल्या दिवशीच ३१ मार्च रोजी हजारे यांनी अतिक्रमण कारवाईची गोपनीय माहिती लोकांना पुरविली. त्यामुळे कारवाईत अडथळा निर्माण झाला. याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली असता हजारे यांनी कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवत हजारे यांना निलंबित केले आहे. अभियांत्रिकी सहायक निलंबित स्थापत्य अभियांत्रिकी सहायक शेषेराव अटकोरे यांना निलंबित केले असून त्यांचीही विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. अटकोरे हे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदावर कार्यरत आहेत. अटकोरे यांनी अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई केली नाही. सर्वेक्षण केले नाही. अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामांमध्ये मोठी वाढ झाली. याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली असता कोणतेही उत्तर त्यांनी दिले नाही. त्यामुळे कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत अटकोरे यांनाही निलंबित केले आहे.