राज्यात ‘या’ तारखेला सक्रीय होणार मान्सून

मुंबई – मुंबईसह राज्याच्या अनेक भागात 18 जूनपासून मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांत तापमान वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. परंतु, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून सक्रीय झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र जून महिन्यातले पहिले 15 दिवस हे पावसाविनाच गेले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निम्मा महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात काही भागात ऊन, तर काही भागात दमट वातावरण आहे. कणकवली तालुक्यात अर्धातास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. चार दिवसाच्या विश्रांतीनंतर कणकवलीत आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनाला दिलासा मिळाला आहे.
राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये 50 ते 80 टक्क्यांनी कमी पाऊस झाला. अशी विदारक परिस्थिती असताना मान्सूनबाबत आनंदाची बातमी असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मान्सून पोहचला आहे.
येत्या 18 तारखेपर्यंत विदर्भातील उर्वरीत भागातही मान्सून दाखल होणार आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाउस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.





