पिंपरी | मोबाइल काही सुटेना… पोरं जागची उठेना !

कान्हे, (सोपान येवले) – हल्ली ग्रामीण भागात लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नगरिकांपर्यंत सर्वांनाच मोबाइलचा लळा लागलेला दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तासन् तास रील पाहत बसणारी पोरं ते यूट्यूबवर कीर्तनं, गाणी ऐकणारी प्रौढ माणसं असं चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
याचा परिणाम जसा शरीरावर, कामांवर होतोय, तसाच सामाजिक प्रकृती देखील बिघडताना दिसत आहे. एकेकाळी गावात पारावर रंगणाऱ्या चर्चा, घरातून ऐकू येणारे गप्पांचे आवाज हरवत चालल्याचे गंभीर चित्र यातून निर्माण झाले आहे.
पूर्वी मोबाइल तसे दुर्मिळ होते. ग्रामीण भागात तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे मोबाइल असायचा. परंतु मोबाइल क्रांती झाली, इंटरनेट क्रांती झाली आणि मोबाइल कंपन्यांमधील स्पर्धा वाढून मोबाइलचे दर कमी झाले. यामुळे कमी पैशात ग्रामीण भागातील व्यक्तीच्या हातातही मोबाइल आला.
पूर्वी मुलांच्या हातात मोबाइल देताना पालक दहादा विचार करायचे. परंतु आता शाळा, कॉलेजात पोरं दप्तरात मोबाइल घालून नेतात, तर चिमुकल्यांना जेवू घालताना मोबाइल दाखवला जातो. असे गंभीर चित्र समाजात निर्माण झाले आहे.
स्मार्टफोनचा अतिवापर घातक –
स्मार्टफोनचा वापर हा विविध कारणांसाठी करता येतो. त्यातून संपर्कासोबत व्यवसाय, मनोरंजन आदी गोष्टी देखील करता येतात. असे असले तरीही निव्वळ मनोरंजनासाठी होणारा स्मार्टफोन वापर आणि त्याचा अतिरेक घातक ठरत आहे. स्मार्टफोन्सवर उपलब्ध विविध गेम्सच्या नादात मुलांनी जीव गमाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
तर, लहानग्यांना शांत करण्यासाठी दाखवला जाणारा मोबाइल त्यांच्या डोळ्यांना अपाय करतो, असे संशोधनातून समोर आलंय. प्रौढ व्यक्तींमध्येही मोबाइल वापराचे प्रमाण वाढले असून त्यामुळे संवाद, वाचन कमी झाल्याने ताणतणाव वाढू लागला आहे. अनेकांना तर मोबाइलचं व्यसन जडलंय. यातून चिडचिड होणे, विसंवाद होणे याचे प्रमाण वाढले आहे.
गप्पा हरवल्या…
पूर्वी मोबाईल, टीव्ही असं काही नव्हतं. टीव्ही जरी मोबाइलच्या मानाने लवकर आला असला तरीही त्याचा परिणाम इतका नव्हता. लोकं एकमेकांच्या घरी जात होती. पारावर, ओसरीवर, झाडांखाली गप्पा, चर्चा रंगलेल्या दिसत होत्या. आता मोबाइलमुळे माणसं जवळ आली असली तरीही त्यांच्यातील संवाद हरवत चाललाय, हे समाजासाठी घातक आहे.





