पुणे – लोणीकंद पोलिस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलिस उपनिरीक्षक शुक्रवारी (दि.26) दुपारी बेपत्ता झाले होते. अखेर शनिवारी दुपारी चार वाचताच्या सुमारास ते न्हावी सांडस येथील एका हॉटेलवर मिळून आले. राहुल खंडू कोळपे (वय-35) असे बेपत्ता झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी, लोणीकंद पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान कोळपे कोणत्या कारणातून बेपत्ता झाले होते हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक कोळपे हे लोणीकंद पोलिस ठाण्यात नेमणूकीस आहेत. शुक्रवारी दुपारी ते वाघोली येथील घरातून निघून गेले होते. त्यांनी आपले मोबाईल देखील घरात ठेवले होते. त्यामुळे कोळपे नेमकं कोठे गेले हे समजू शकत नव्हते. दरम्यान, याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके कोळपे यांचा शोध घेत होती. शनिवारी चार वाजताच्या सुमारास कोळपे हे न्हावी सांडस येथील एका हॉटेलवर मिळून आले. मात्र कोळपे कोणत्या कारणातून बेपत्ता झाले होते हे समजू शकले नाही.