पुणे जिल्हा | मृत व्यक्तीची आठवणी सावलीप्रमाणे राहावी

वालचंदनगर, (वार्ताहर) – मृत्यूनंतर ही ’त्या’ व्यक्तीची आठवण अबाधित राहावी असे सर्वांनाच वाटत असते. आठवणीतून ’त्या’ व्यक्तीचे अबाधित रहाणे केवळ कुटुंबापुरते असू नये, अगदी अनोळखी लोकांपर्यंत ते सावलीप्रमाणे पोहोचावे या दृष्टिकोनातून आज गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी इंदापूरमध्ये वटवृक्षाची रोपे लावली.
गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या सासुबाई सुजाता दत्तात्रय साठे यांचे करोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची आठवण अबाधित राहावी यासाठी ते ज्या भागात कार्यरत असतील त्या भागात वटवृक्षाची रोपे लावत असतात. इंदापूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातही त्यांनी वृक्षारोपण केले. यापूर्वी अक्कलकोटमध्ये ही त्यांनी हा उपक्रम राबवला होता.
प्रभातशी बोलताना त्यांनी सांगितले की, स्मृतिप्रित्यर्थ घरगुती कार्यक्रम करता येणे शक्य असते; मात्र आपल्या घरातील गेलेल्या माणसाची स्मृती जतन करताना, इतरांचा व पर्यावरणाचा विचार करुन उपक्रम आखणे मला योग्य वाटले.
कारण झाडे जगली तर माणसे जगतील हा आपला सिद्धांत आहे. म्हणून सर्वांना मायेची सावली देईल अशा वटवृक्षाची रोपे लावण्याचे निश्चित करुन, तसा उपक्रम कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.





