एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ; चर्चांना उधाण

मुंबई : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी पवारांना दिलेली ही अनौपचारिक भेट होती, असे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार त्यांनी या भेटीचे सत्र शरद पवारांपासून केल्याचे म्हटले जात आहे. शिंदे आणि पवार यांच्या भेटीचे फोटोही समोर आले आहेत.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शिंदे हे सकाळीच मुंबई महानगरपालिकेमधील आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते दिवसभर मुंबईमध्येच होते. याच दरम्यान ते सायंकाळी शरद पवारांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते.
पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील ज्येष्ठ नेते आहेत. सत्तासंघर्षामध्ये जरी ते विरोधी बाकावर असले तरी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने शिंदेंनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक गप्पा झाल्या. यावेळी शिंदे हे एकटेच होते, त्यांच्यासोबत इतर कोणाताही नेता नव्हता.
शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकीत केले होते. त्यानंतर शिंदे यांनी पवारांची घेतलेली ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.





