पुणे जिल्हा | पाटसच्या मुख्य चौकाचा श्वास मोकळा

पाटस, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील पाटस येथील मुख्य चौकातील वाहतुकीस अडथळा निर्माण होणारे व्यावसायिक अतिक्रमण ग्रामपंचायत प्रशासनाने काढल्याने चौकाने मोकळा श्वास घेतला. या जागेचा वापर विधायक विकासकामांसाठी केला आहे.
पाटस गावात प्रवेश करताना कानगाव रस्ता, सेवा रस्ता, इतर मार्गांचा मुख्य चौक आहे. चौकात नागरिकांची नेहमी वर्दळ असते.
मात्र, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवतारा कॉप्लेक्सपर्यंत जाणा-या रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला आडथळा निर्माण होत होता. रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन धारकासह वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
याच मुख्य चौकात एसटी बसचा थांबा असल्याने प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. याच मुख्य चौकात वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक एसटी बस पुलावरून जात असल्याने प्रवाशांना तासांत एसटी बसची वाट पाहावी लागत होती.
त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याच चौकात सणासुदीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. ग्रामपंचायत हद्दीतील व्यावसायिक अतिक्रमणवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
पाटस गावाच्या मुख्य रस्त्यावर व्यापा-यांनी अतिक्रमण केले होते. अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांसोबत सकारात्मक चर्चा करून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवित चौक व रस्ता व चौक खुला केला आहे.
अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून संबंधित व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. अतिक्रमण काढल्याने चौकाने मोकळा श्वास घेतला असून अतिक्रमण हटविल्याने नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्य चौकातील व्यावसायिक अतिक्रमण काढून प्रवाशांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था केली आहे. त्यामुळे बाहेरगावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून व स्थानिक ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
पाटस गावातील पोलीस चौकी समोरील व इतर व्यावसायिक अतिक्रमण लवकर काढावे, अशी मागणी होत आहे.
पाटस गावातील मुख्य रस्त्यावर व्यावसायिक अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडी होत होती. अतिमहत्त्वाच्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामपंचायतकडे मागणी केली जात होती.
त्यामुळे व्यावसायिक अतिक्रमण सकारात्मक मार्गाने काढले आहे. इतर ठिकाणचे अतिक्रमण लवकरच काढण्यात येईल.- तृप्ती भंडलकर, सरपंच, पाटस.



