Pimpri | मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी यंत्रणा सज्ज

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मावळ मतदारसंघात आज, बुधवार (दि.२०) रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यालयाकडून मावळातील एकूण ४०२ मतदान केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण केली असून सकाळी सात वाजल्यापासून विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान सुरु होत आहे. मतदारसंघातील सर्व मतदारांनी निर्भयपणे घराबाहेर पडून मतदान करावे आणि लोकशाहीतील आपला प्रमुख हक्क बजवावा असे आवाहन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे.
मंगळवारी (दि.१९) तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनियरिंग कॉलेडमधील स्ट्राँग रूममधून प्रत्येक मतदान केंद्रावर जाणाऱ्या पोलिंग ग्रुपने मतदानासाठीचे आपले साहित्य ताब्यात घेतले आणि मतदान केंद्र गाठले. तिथे निवडणूक मतदान कामकाजाच्या नियमानुसार मतदानासाठी कक्ष तयारी पूर्ण करण्यात आली. सायंकाळपर्यंत मावळ मतदारसंघातील जवळपास सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली होती.
मोबाईल घरी ठेवूनच मतदानाला जावं
कोणत्याही मतदान केंद्रावर उमेदवार, उमेदवाराचे प्रतिनिधी तसेच मतदारांना मोबाईल फोन घेऊन जाण्यास व वापरण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध केलेला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. मतदान केंद्र अधिकारी व निवडणूक आयोगाने परवानगी दिलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही मतदान केंद्र परिसरात मोबाईल घेऊन येण्यास व वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास १२ प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.
अडीच हजार कर्मचारी पूर्ण करणार मतदान प्रक्रिया
मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण ४०२ मतदान केंद्र आहे. यात एक संवेदनशील मतदान केंद्र आहे. मावळात एकूण ३ लाख ८६ हजार १७२ मतदार आहेत. मतदान केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष आणि तीन सहकारी असतील, ज्या मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार तिथे एक अतिरिक्त अध्यक्ष असेल. मावळात मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक कर्मचारी व पोलीस असे एकूण २५०० कर्मचारी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे.
मावळ मतदारसंघात बुधवारी (दि.२० नोव्हेंबर) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाला जाताना मतदारांनी मतदान कार्डसह आणखीन एक ओळखपत्र सोबत जावे. तसेच मतदानाला जाताना आपला मोबाईल घरीच ठेवावा. मतदारांनी निर्भयपणे घराबाहेर पडून मतदान करावे.
– विक्रम देशमुख, सहाय्यक निवडणूक अधिकारी, मावळ विधानसभा





