Nayanthara: ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराचं आलिशान आयुष्य! १०० कोटींचा बंगला ते स्वतःचं प्रायव्हेट जेट
Nayanthara नयनताराच्या वैयक्तिक आयुष्यातील काही निर्णयांची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. तिचे नाव अभिनेता, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभुदेवा यांच्याशी जोडले गेले होते. दोघांच्या नात्याबद्दल मनोरंजनविश्वात अनेक चर्चा रंगल्या होत्या.

Nayanthara: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नयनतारा आज (१८ नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांमधील दमदार भूमिका, कोट्यवधींची संपत्ती आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय यामुळे नयनतारा नेहमीच चर्चेत असते. एका सामान्य मुलीपासून ते कोट्यवधींची मालकीण आणि आघाडीची अभिनेत्री होण्यापर्यंतचा तिचा प्रवास खरोखरच रंजक आहे.
डायना मरियम कुरियन ते नयनतारा
नयनताराचा जन्म १८ नोव्हेंबर १९८४ रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. तिचे मूळ नाव डायना मरियम कुरियन असे आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तिने मॉडेलिंग आणि सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात काम केले. त्यानंतर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.
२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मनासिनाक्कारे’ या मल्याळम चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तिने मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम केले होते.
त्यानंतर ‘राजा राणी’, ‘नानुम राऊडी धान’, ‘अराम’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. पुढे शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही दमदार पदार्पण केले.

Nayanthara
प्रेमासाठी केले धर्मांतर; मात्र नातं टिकू शकलं नाही
नयनताराच्या वैयक्तिक आयुष्यातील काही निर्णयांची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. तिचे नाव अभिनेता, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभुदेवा यांच्याशी जोडले गेले होते. दोघांच्या नात्याबद्दल मनोरंजनविश्वात अनेक चर्चा रंगल्या होत्या.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, या नात्यादरम्यान नयनताराने २०११ मध्ये ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्म स्वीकारला होता. तिच्या या निर्णयाची त्यावेळी मोठी चर्चा झाली. मात्र, प्रभुदेवा आणि नयनतारा यांचे नाते पुढे टिकू शकले नाही. अखेर दोघांनीही आपापले मार्ग वेगळे केले.
यानंतर नयनताराच्या आयुष्यात दिग्दर्शक विग्नेश शिवन यांची एंट्री झाली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सरोगसीच्या माध्यमातून या जोडप्याच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन झाले. सध्या नयनतारा आपल्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
१०० कोटींचा बंगला आणि स्वतःचे प्रायव्हेट जेट!
नयनतारा केवळ अभिनयामुळेच नाही, तर तिच्या आलिशान जीवनशैलीमुळेही चर्चेत असते. माध्यमांतील वृत्तांनुसार, तिची एकूण संपत्ती जवळपास २०० कोटी रुपये आहे. चेन्नईतील एका पॉश परिसरात तिचा चार बेडरूमचा आलिशान बंगला असून त्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय नयनताराकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट असल्याचीही चर्चा आहे. ती अनेकदा या विमानातून प्रवास करताना दिसते. तिच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू सीरिज ७, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, मर्सिडीज जीएलएस आणि मर्सिडीज मेबॅक यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
‘जवान’मुळे १००० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
नयनताराच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे शाहरुख खानसोबतचा ‘जवान’ हा चित्रपट. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले. जगभरात या चित्रपटाने १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. त्यामुळे नयनताराच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली.
आज नयनतारा ही केवळ दाक्षिणात्य अभिनेत्री राहिलेली नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी नाव बनली आहे. वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार, नात्यांमधील बदल आणि व्यावसायिक यश अशा अनेक टप्प्यांतून मार्ग काढत तिने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच तिला मिळालेली ‘लेडी सुपरस्टार’ ही ओळख तिच्या चाहत्यांसाठी विशेष महत्त्वाची आहे.





