विद्या प्राधिकरणाचा ‘लूक’ बदलतोय…

पुणे (डॉ.राजू गुरव) -महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्वयंस्फूर्तीने (विद्या प्राधिकरण) “शून्य कचरा प्रकल्प’ राबविण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे एकेकाळी भंगार मालाचा व अस्वच्छतेचा अड्डा बनलेल्या विद्या प्राधिकरणाच्या आवाराला आता सुंदर रूप मिळत आहे. ओला, सुका, घातक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत असून, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
विद्या प्राधिकरण ही प्रशिक्षणाची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. राज्यातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी विविध घटकांवर आधारित प्रशिक्षण घेण्यात येत असते. मात्र मागील काही वर्षांमध्ये विद्या प्राधिकरणाच्या आवाराची विचित्र अवस्था बनली होती. विद्या प्राधिकरणाच्या संचालकपदाची सूत्रे राजेश पाटील यांच्या हाती आल्यानंतर त्यांनीही फेरफटका मारुन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी आवाराचे स्वरुप बदलण्यासाठी कार्यवाही सुरू केली. त्यातूनच त्यांनी “शून्य कचरा प्रकल्प’ राबविण्याचा संकल्प करुन त्याची अंमलबजावणीही तातडीने सुरु केलेली आहे. आसरा सोशन फौंडशनच्या संस्थापिका अचर्ना मोरे यांच्या सहकार्याने व प्रशिक्षणातून प्रकल्प राबविला जात आहे. संचालकांपासून शिपाई या सर्वांचा यात उत्स्फूर्तपणे सहभाग असणार आहे.
विविध समित्यांची स्थापना
या शून्य कचरा उपक्रमाची निरंतर अंमलबजावणी व्हावी, यासाठी ओला कचरा व्यवस्थापन समिती, सुका कचरा व्यवस्थापन, घातक कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक नियंत्रण व टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार किंवा सजावट समिती, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वृक्षारोपण, संगोपन समिती, सोशल मीडिया समिती आणि शून्य कचरा व्यवस्थापन समिती अशा 7 समितीद्वारे कार्य केले जाते. यासाठी शून्य कचरा खाते वहीपासबुक तयार करण्यात येत आहे.
“चिऊ-काऊ’चा घास अन् खत
“आठवड्यातील एक दिवस माझ्या कार्यालयातील अंगणासाठी’ या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी सायंकाळी अधिकारी, कर्मचारी सर्वजण एकत्र येऊन कार्यालयाच्या आवारात स्वच्छताही करू लागले आहेत. पालापाचोळा कंपोस्ट पिटमध्ये टाकून त्याचे खत तयार केले जाणार आहे. अन्न उरवले जाणार नाही. थोडं फार उरल असेल, तर “चिऊ-काऊ’चा घास म्हणून कार्यालयाच्या मोकळ्या आवारातील कोपऱ्यामध्ये पक्ष्यांसाठी टाकले जात आहे.
प्लॅस्टिक वापरास बंदी घालणार
सुका कचऱ्यातील रद्दी पेपर, पत्रिका, बॉक्स, लिफाफे या सर्व कचऱ्याचे वर्गीकरण करून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ओंकार दहीवळ याने तयार केलेल्या “स्क्रॅप मॅन’ या स्टार्ट अपला देवून देऊन नवीन पेपर मिळवला जाणार आहे. कार्यालयात प्लॅस्टिक वापराला बंदीही घालण्यात आलेली आहे. अधिकारी, कर्मचारी महिन्यातून एकदा घरातील प्लॅस्टिक कचरा कार्यालयात आणणार असून तो “सागर मित्र’ या संस्थेकडे सोपविला जाणार आहे, असे सांगण्यात आले.





