पुणे जिल्हा | उजनी काठावरील बळीराजाचा जीव टांगणीला

पळसदेव, (वार्ताहर) – उजनी धरणात मायनसमध्ये पाणीसाठा असताना देखील पिण्यासाठी सध्या उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे उजनी धरनातील पाण्याची पातळी एकदम खालावली आहे. काठावरील गावातील शेतीला पाणी पुरवठा करणारे शेकडो विद्युतपंप बंद पडेल आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून काढलेल्या चार्यादेखील बंद पडल्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पिके करपू लागल्याने बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे.
लोकसभा निवडणूक संपली. पाण्याचं राजकारण करून नेते मंडळी मोकळे झाले आहेत. आता मात्र निवडणूक काळात आश्वासन देणारे नेते मंडळींना बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था पाहायला देखील वेळ नाही. आता बळीराजा पाण्यासाठी रोज मरणयातना सहन करतं आहे. वर्षभर रक्ताचं पाणी करून जगवलेली पिकं आता ऐन पावसाळा तोंडावर आला असताना सोडून देणं शक्य नाही.
यासाठी बळीराजा एक दोन तास तरी आपला विद्युतपंप चालेल या आशेवर दिवस दिवस धडपडत नदीकाठावर घालवत आहे. काही शेतकर्यांनी दोन तीन विद्युतपंप जोडून शेतात पाणी नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नदी काठावर नुसते पाईप व केबलचे जाळेच पसरलेलं पाहावयास मिळत आहे. सध्या कोट्यवधी रुपये खर्च करून नदीपात्रात काढलेल्या चार्यांना देखील नदीची पाणीपातळी खूप कमी झाल्याने पाणी येत नाही. नदी पात्रातील अनेक चार्या आता मोकळ्या पडल्या आहेत.
त्यामुळे पाण्यासाठी धडपड करणारा बळीराजा मात्र जसे पाणी कमी होईल तसे पाइप, केबल वाढवून शेतात पाणी नेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. यामध्ये लाखो रुपयांचा खर्च करण्याची वेळ शेतकर्यावर आली आहे. शिवाय पाईप वाढवूनही फारसा फायदा होत नसल्याचं चित्र आहे. नदी पात्रात पाणी कमी आणि गाळच अधिक असल्याने अगदी जीवावर उदार होऊन नदी पात्रात पाईप टाकावा लागत आहे. एक फूट पाण्याच्या ठिकाणी आठ ते दहा फूट गाळ असल्याने बळीराज्याचा जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
आणखी किती पिढ्यांना संघर्ष
बळीराजाचा हा संघर्ष संपणार तरी कधी का, आमच्या येणार्या सर्व पिढ्यांना हाच संघर्ष करावा लागतो की काय, असा प्रश्न उजनी काठावरील शेतकर्याला पडला आहे. नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने उजनी धरणावर आधारित अनेक गावाला पाणी पुरवठा करणार्या पाणीयोजना देखील बंद पडल्या आहेत.
धरण शेजारी असून देखील गावात पिण्यासाठी टँकर मागवण्याची वेळ अनेक गावावर आली आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन हाच या सर्वांवर एकमात्र उपाय असल्याचं शेतकरी सांगत आहे.




