वकीलाची गोळ्या घालून हत्या ! न्यायालयाच्या आवारात झालेल्या प्रकारामुळे गाझियाबाद हादरले

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात एका वकीलाची चेंबरमध्ये घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मनोज चौधरी उर्फ मोनू जाट असे हत्या झालेल्या वकीलाचे नाव असून दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या चेंबरमध्ये भोजन करत असताना 2 अज्ञात बंदुकधाऱ्यांनी चेंबरमध्ये घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ऍड. मनोज चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
गोळीबाराच्या घटनेनंतर थोड्या वेळाने फॉरेन्सिक तज्ज्ञांसह पोलीस घटनास्थळी पोचले. न्यायालयाच्या आवारातील सीसीटिव्हीचे चित्रीकरण तपासत आहेत, असे गाझियाबाद शहराचे पोलीस उपायुक्त निपुण अगरवाल यांनी सांगितले.
गोळीबार झाला तेंव्हा वकील पश्चिम उत्तर प्रदेश बार असोसिएशनने हापूर येथील वकिलांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या संपाबाबतच्या रणनितीबाबत चर्चा करत होते. न्यायालयाच्या आवारात झालेल्या या हत्येच्या प्रकारामुळे संपूर्ण गाझियाबादमध्ये खळबळ उडाली आहे.





