सैनिकांना घेऊन जाणारे ब्रिटनचे शेवटचे विमान काबूल विमानतळावरून रवाना

लंडन – ब्रिटनने अफगाणिस्तानातील सैन्य माघारीची आपली प्रक्रिया आज पूर्ण केली. आपल्या उर्वरीत सैनिकांना घेऊन जाणारे ब्रिटनचे शेवटचे विमान आज काबूल विमानतळावरून रवाना झाले.
ही माघारीची प्रक्रिया अत्यंत धाडसाने पार पाडल्याबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आपल्या लष्कराचे अभिनंदन केले आहेत. तथापि एका वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्याने कबूल केले की प्रत्येकालाच आम्ही तेथून बाहेर काढू शकलो नाही. काल शनिवारी एकूण 1000 ब्रिटीश सैनिक तेथून रवाना झाले आहेत. त्या आधी जितक्या नागरीकांना काबुल मधून बाहेर काढता येईल तितक्या नागरीकांना ब्रिटिश सैनिकांनी तेथून बाहेर जाण्यास मदत केली आहे.
ब्रिटनचे अफगाणिस्तानातील राजदूत लॉरी ब्रिस्टॉ यांनी काबूलच्या विमानतळावरून सांगितले की, आता आमचे येथील ऑपरेशन बंद करण्याची वेळ आली आहे आणि आम्ही तो टप्पा आज पुर्ण करीत आहोत.
जे अजून अफगाणिस्तानातच राहिले आहेत त्यांना तेथून बाहेर पडण्यासाठी आम्ही शक्य ती मदत करतच राहु. तसेच आम्ही शूर आणि सभ्यपणे वागणाऱ्या अफगाणि नागरिकांनाही विसरणार नाही. त्यांना आता येथे सुरक्षा आणि शांतता लाभो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.





