पुणे जिल्हा | कुरण येथे वनविभागाची जमीन लाटली

नारायणगाव, (वार्ताहर) – कुरण (ता. जुन्नर) येथील वनविभागाच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न झाला असल्याचे उघड झाले शुक्रवारी (दि. 13) जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी जुन्नर पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे.
कुरण येथील गट नंबर 442 व 454 (जुना सर्व्हे नंबर 96) व नवीन गट नंबर 452 (जुना सर्व्हे नंबर 95) येथील वन जमीन प्रकरणात बेकायदेशीर दस्त नोंदणी झाली आहे.
जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी वन जमीन, वन्यजीव व वने यांचे संरक्षण व संवर्धन करणे असे मुख्य कर्तव्य समजून कुरण नवीन गट नंबर 454 (जुना सर्व्हे नंबर 96), नवीन गट नंबर 452 (जुना सर्व्हे नंबर 95) चे दस्त नोंदणी गैरव्यवहार प्रकरणात अरुण दत्तात्रय देशमुख (रा. कुरण, ता.जुन्नर), अलका रघुनाथ लेंडे (रा.पिंपळवंडी, ता. जुन्नर),
शुभांगी सुहास देशमुख (रा. जुन्नर), अनिकेत रघुनाथ लेंडे (रा. पिंपळवंडी, ता . जुन्नर), शकुंतला गोविंद गणेशकर (रा. वाणेेवाडी, पो.आपटाळे ता.जुन्नर), रोहन शेखर गणेशकर (रा. वाणेवाडी पो.आपटाळे ता.जुन्नर), रघुनाथ आबाजी लेंडे (रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), सहाय्यक संचालक पुराभिलेख संचालनालय मुंबई यांच्याकडील अज्ञात व्यक्ती,
तत्कालीन दुय्यम निबंधक नारायणगाव यांनी शासकीय वन जमीन पूर्णपणे खासगी मालकीची ठरवून त्या आधारे दुय्यम निबंधक नारायणगाव यांच्याकडे खरेदीखत करून जमीन नावावर करून घेतली. वनविभागाच्या अधिनस्त असलेल्या वन जमिनीचा बनावट दस्ताच्या आधारे आपहार, कटकारस्थान, फसवणूक व गैरलाभ घेतला म्हणून कायदेशीर फिर्याद केली आहे
वनविभागाने चौकशी केली असता कुरण येथील जमिनीचे गैर व्यवहार प्रकरणात बनावट दस्ताच्या आधारे दस्त नोंदणी करण्यात आली असल्याचे आढळून आले आहे. बॉम्बे शासन राजपत्र शासन अधिसूचना 21 मार्च 2018 सेक्शन एक, पान नंबर 550 अधिसूचना बनावट करण्यात आली आहे.
अधिसूचनेच्या बाबत एशियाटिक सोसायटी मुंबई व संचालक पुराभिलेख विभाग पुणे येथे एक सारखी प्रत असल्याचे दिसून आले.
परंतु संचालक पुराभिलेख विभाग मुंबई यांच्याकडे अधिसूचनेमध्ये फरक दिसून येत आहे. त्यांच्या कार्यालयात उपलब्ध झालेल्या अधिसूचनेमधील सुरुवातीचा परिच्छेद टंकलिखित असून उर्वरित परिच्छेद संगणकीय फॉर्ममध्ये असल्याने तफावत दिसून येत आहे.
बॉम्बे शासन राजपत्र शासन अधिसूचना दिनांक 14 जुलै 1938 सेक्शन एक, पान नंबर 1461 अधिसूचनेमध्ये बनावटीकरण करण्यात आले आहे सदरची अधिसूचना संचालक पुराभिलेख विभाग पुणे यांच्या कार्यालयात उपलब्ध झालेली नाही.
यावरून कुरण (ता. जुन्नर) येथील गट नंबर 442 व 454 (जुना सर्वे नंबर 96) व नवीन गट नंबर 452 (जुना सर्वे नंबर 95) राखीव जमिनीचे निर्वाणीकरण झालेले नाही.
ज्या निर्वाणीकरण अधिसूचनेच्या अनुषंगाने या वन जमिनीचे खरेदीखत, साठेखत, गहाणखत, करारनामे तसेच इतर दस्त नोंदणी झालेली आहे.
अधिसूचनेमध्ये अनधिकृत फेरबदल करून बनावट अधिसूचनेचा वापर करून राखीव वन जमीन हस्तांतरणाचे व्यवहार झाले असल्याचे दिसून आली असून वरील गटातील जमिनीची दुय्यम निबंधक नारायणगाव येथे अवैध दस्त नोंदणी करण्यात आली आहे.
वनविभागाने चौकशी केली असता संदीप विठ्ठल रोहकले (रा. पिंपळवंडी ता.जुन्नर) यांनी या प्रकरणाचे काही दस्तऐवज वनविभाग कार्यालयास उपलब्ध करून दिले होते. त्याच्या आधारे महसूल विभागाकडून वाटप करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे.
प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न
कुरण येथील वनविभागाच्या जमिनी लाटण्याच्या संदर्भात झालेल्या बनावट दस्त नोंदणीबाबत रघुनाथ लेंडे, अनिकेत लेंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
व्हॉट्सप कॉल केला असता उचलला नाही. मेसेज केला असता प्रतिक्रिया दिली नाही. दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी दोन दिवस सुट्टी असल्याने बुधवारी दस्तऐवज बघून प्रतिक्रिया देण्याचे सांगितले.





