मजूराला सापडला 7 कॅरेटचा हिरा

पन्ना (मध्यप्रदेश) – एखाद्याचे नशिब कसे अचानक खुलते, याचा अनुभव मध्यप्रदेशातील एका मजूराला अलिकडेच आला आहे. मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये एका खाणीमध्ये काम करत असताना या मजूराला चक्क 7.2 कॅरेटचा हिरा सापडला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
बलबीरसिंग यादव असे या मजूराचे नाव असून त्याने हा हिरा जिल्ह्यातील पाटी बजरिया भागातील कृष्णा कल्याणपूर खाणीतून काढला, अशी माहिती हिरे निरीक्षक अनुपम सिंह यांनी दिली. हिरा सापडल्यानंतर बलबीरने तो अधिकाऱ्यांकडे जमा करण्यासाठी खाण कार्यालयात धाव घेतली.
हिऱ्याचे नेमके मूल्य अधिकारीच निश्चित करू शकतील, असे त्यांना खाणीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या हिऱ्याची किंमत अंदाजे 35 ते 40 लाख रुपयांपर्यंत निश्चित होईल, असे बलबीर आणि त्याच्या पत्नीला अधिकाऱ्यांनी सांगितले. हे ऐकून या दाम्पत्याला अत्यानंद झाला.
या हिऱ्याचा लिलाव केला जाणार आहे. त्यानंतर 12.5 टक्के रॉयल्टी वजा करून उर्वरित रक्कम या दाम्पत्याला मिळेल. बुंदेलखंडच्या मागास भागात असलेले पन्ना हिऱ्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.





