वाघोली – भाजप नेते राहुल कुल, प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली प्रादेशिक योजनेतील 30 मी रुंदीचा खांदवेनगर जकात नाका ते कटकेवाडी ( प्रा. जि. मा.56 ) येथे पुणे नगर रस्त्यास वाघोली बाह्यवळण करून जुळणारा रस्ता करण्यासाठी पीएमआरडीए आयुक्त राहुल मेहवाल यांनी नुकतीच भेट घेतली, माजी उपसरपंच संदीप सातव यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. हा रस्ता नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणारा ठरणार असल्याने हा रस्ता कधी होणार असा सवाल आता नागरिकांकडून केला जात होता.
हाच प्रश्न शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत उपस्थित करून वाघोलीची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. याबाबतीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकारतर्फे 34 गावांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत जी बैठक आयोजित करण्यात येणार आहे त्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सभागृह दिले. त्यामुळे वाघोलीच्या विविध प्रश्नांसोबतच वाहतुकीचा प्रश्न देखील विधानसभेत गाजला आहे.
वाघोली गावाची लोकसंख्या सुमारे तीन लाखांच्या आसपास पोहचली असून या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जिल्हाभर गाजत आहे. वाघोली मधून पुणे -नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्ग जात असून या महामार्गावर रांजणगाव , सणसवाडी , कोरेगाव एमआयडीसी आहे. वाघोली लोणीकंद, भावडी , फुलगाव, इतर भागात मोठ्याप्रमाणावर क्रेशर आहेत. याची वाहतूक करणारे अनेक गाड्या आहेत, अनेक शाळा , महाविद्यालय, कॉलेज, गोडाऊन, असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते.
पुणे शिरूर रस्त्यावर ट्रॅफिक काउन्ट दिवसाला 66746 PCU आहे. वाघोलीसाठी कोणताही बायपास नाही. पुणे – नगर रस्त्यावरील वाघोली येथील वाहतूक कोंडीची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. पीएमआरडीएकडून पर्याय रस्ता म्हणून दक्षिण बाजूस 30 मी रुंदीचा प्रादेशिक योजनेतील रस्ता प्रस्तावित केला आहे. सदरचा रस्ता करणे अत्यंत गरजेचे असून सदर रस्ता झाला तर वाघोलीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल यासाठी हा रस्ता लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.