राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर; तीन महिन्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याची आकडेवारी समोर

Maharashtra Farmers | राज्यात जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीत तब्बल ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. त्यातील ३७३ पात्र प्रकरणांपैकी ३२७ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. यात २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे, अशी माहिती मकरंद पाटील यांनी दिली आहे.
आमदार डॉ. प्रज्ञा सातव, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी सांगितले की, ३७३ पात्र प्रकरणांपैकी ज्यांना मदत मिळाली नाही अशांना मदत देण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. तर, प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
पश्चिम विदर्भात २५७ शेतकरी आत्महत्या
पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांत तीन महिन्यांत २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात यवतमाळमध्ये ८१, अमरावतीत ५०, अकोल्यात ४८, बुलढाण्यात ४२, वाशिममध्ये ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम विदर्भात तीन महिन्यांत २५७ आत्महत्या झाल्या असून, राज्यभरात ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे लेखी उत्तरात सांगितले. पश्चिम विदर्भातील ७६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत तर ७४ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. १०७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती दिली.
दरम्यान, मागील हंगामात कापूस, सोयाबीनला दर मिळाला नाही. कर्जबाजारीपणा वाढल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले. अतिपावसात अनेकांची पिके हातून गेली. यातच शासनाकडून कर्जमाफी झाली नाही. यामुळे या सर्व अडचणी वाढल्या व शेतकरी आत्महत्येची समस्याही तीव्र झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा:
Pune : मार्केट यार्डात दुय्यम दर्जाच्या मालाचे प्रमाण वाढले; व्यापारी, मॉलची थेट शेतातून खरेदी





