Rajgurunagar : शेतरस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार – आमदार काळे
Rajgurunagar : आमदार काळे म्हणाले, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत दाखल झालेला एकही रस्ता प्रलंबित राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध होणारी कामे त्या निधीतून, तर आवश्यकतेनुसार उर्वरित कामे सीएसआर निधीतून पूर्ण केली जातील.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील शेतकर्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतरस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत तालुक्यातील नऊ शेत-पाणंद रस्त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, उर्वरित रस्त्यांची कामे शासन आणि सीएसआर निधीतून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.
शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्या व तांड्यांपर्यंत रस्ते सुविधा पोहोचावी, या उद्देशाने खेड तहसील कार्यालयात आमदार काळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विविध गावांमधून आलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.
आमदार काळे म्हणाले, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत दाखल झालेला एकही रस्ता प्रलंबित राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध होणारी कामे त्या निधीतून, तर आवश्यकतेनुसार उर्वरित कामे सीएसआर निधीतून पूर्ण केली जातील. शेतरस्ते ही केवळ रस्त्यांची योजना नसून शेतकर्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि शेतीच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेली चळवळ आहे. लोकसहभागातून प्रत्येक गरजू शेतरस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, समितीचे सहअध्यक्ष शांताराम भोसले, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, बांधकाम उपअभियंता श्रीकांत येवले, भूमिअभिलेख विभागाचे नितीन कराळे, भुकरमापक के. बी. जाधव, तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे, समितीचे विठ्ठल वनघरे, दशरथ गाडे, दत्तात्रय होले, मारुती सातकर, भाऊसाहेब होरे, संतोष ढमाले, महेश शेटे, संतोष गोरडे आणि सत्यवान नवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातील शेत-पाणंद रस्ते
आडगाव, गडद, गोलेगाव ते फुलगाव, गोसासी ते कनेरसर, आळंदी ते चर्होली, परसुल, पाईट ते पराळे, वाकी-काळुस रोड, सावरदरी आणि मांजरेवाडी येथील शेत-पाणंद रस्त्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.





