भारतीय ऑलिम्पिक संघटनेचाही चीनला ठेंगा

नवी दिल्ली – चीनबाबतच्या असंतोषात दिवसेंदिवस वाढ होत असताना भारतीय ऑलिम्पिक संघटनेनेही (आयओए) अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. चीनच्या एकाही कंपनीकडून प्रायोजकत्व घेणार नसल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.
ली निंग या चीनच्या क्रीडा साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीचे संघटनेला तसेच संलग्न खेळाडूंना प्रायोजकत्व आहे. मात्र, सरकारने याबाबत आक्षेप घेतला तर या कंपनीशी असलेला करार मुदतीपूर्वीच संपुष्टात आणला जाईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
चिनी मोबाइल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा दैनंदीन जीवनातील वापरल्या जात असलेल्या वस्तूंवर देश पातळीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन देशात विविध स्तरांवर केले जात आहे. त्याला संघटनेने समर्थन दिले असून चिनी जाहिरातदारांशी कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
ली निंग संघटनेच्या खेळाडूंना प्रायोजकत्वाच्या करारान्वये जवळपास 5 कोटी रुपये देते. हा करार 2018 साली अस्तित्वात आला असून आम्ही या बहिष्कारासाठी देशाबरोबर आहोत, त्यामुळे संघटनेला नुकसान झाले तरी चालेल पण हा करार संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी दिली.
चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला तर त्याचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसेल. जर त्यांच्या वस्तूंची आयातच नाकारली तर त्या सामान्या माणसाला खरेदीच करता येणार नाही, असेही मेहता यांनी सांगितले.





