Prithviraj Chavan | काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 मे 2025 रोजी मुंबई येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवरून काही सवाल उपस्थित केले आहेत. याशिवाय त्यांनी ‘वन नेशन-वन इलेक्शन’, ईव्हीएम, सिंधू जल करार यासारख्या मुद्दयांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “१९६५ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, १९७१ मध्ये इंदिरा गांधी आणि कारगिल युद्धाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी संसदेस नियमित माहिती देत असत. आज पंतप्रधान ना जनतेसमोर येतात, ना प्रेस कॉन्फरन्स घेतात, ना संसदेचे अधिवेशन बोलवतात. देशाने युद्धकाळातही पारदर्शिकता राखली आहे. भारत सरकारचे पीओके संदर्भात स्पष्ट धोरण असले पाहिजे, पण ते दिसत नाही,” अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ‘वन नेशन-वन इलेक्शन’चा फायदा जरी दाखवला जात असला तरी, पण ब्रिटीश संसदीय पद्धतीत कधीही लोकसभा किंवा विधानसभा भंग होऊ शकते. मी स्वतः १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये तीन वर्षांत तीनदा लोकसभा निवडणुका लढल्या आहेत. याचा अर्थ लोकसभा कोणत्याही वेळी भंग होऊ शकते, आणि त्यानंतर उपलब्ध कार्यकाळासाठी वेगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ‘केंद्र सरकार EVM हटविण्याची भूमिका घेत नाही’ केंद्र सरकार अमेरिका-प्रणालीप्रमाणे निवडणूक प्रक्रिया भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याचा काँग्रेस विरोध करते. जगभर ईव्हीएम विरोध होत आहे, परंतु केंद्र सरकार अद्यापही EVM हटविण्याची भूमिका घेत नाही, या शब्दांत चव्हाण यांनी निशाणा साधला. ‘मोदी एका तासात विजय शाह याचे मंत्रीपद काढू शकतात, पण…’ “विजय शाह यांनी ऑपेरेशन सिंदूर मधील भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अत्यंत चुकीची प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी मनात आणले, तर एका तासात विजय शाह यांचे मंत्रीपद काढू शकतात, पण मोदी असे करताना दिसत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या मंत्र्यामध्ये आदिवासी वोट बँक दिसत आहे. या प्रकरणावर कोर्टाने ताशेरे ओढले असतानाही या मंत्र्याला पाठीशी घातले जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे,” असा हल्लाबोल चव्हाण यांनी केला. ‘बीसीसीआय सरकार पेक्षा मोठं नाही’ आशिया चषक विषयी चव्हाण म्हणाले की, “सरकारचा निर्णय अंतिम होईल. बीसीसीआय सरकार पेक्षा मोठं नाही. पाकिस्तानने दहशतवादाला आश्रय दिला. त्यामुळे अशा देशाबरोबर सामना का खेळावा? त्याच वेळी, पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंधू पाण्याच्या करारावर सांगितले की, यापूर्वी युद्धे होती पण पाणी कधीही थांबवले नाही. आता काय झाले? संसदेत सरकार चर्चा का करत नाही? संसदेत मौन का?,”असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास