केंद्र सरकारची महत्त्वाची सूचना : लहान मुलांना ‘कफ सिरप’ देणे धोकादायक, साध्या आजारांसाठी औषध टाळा

नवी दिल्ली – लहान मुलांना कफ सिरप देण्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची एडव्हायजरी जारी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप आणि सर्दी-खोकल्याची औषधे अजिबात देऊ नयेत. तर पाच वर्षांवरील मुलांना देखील ही औषधे केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली, योग्य डोस आणि मर्यादित कालावधीतच द्यावीत.
आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, बहुतेक वेळा मुलांमध्ये अचानक होणारा खोकला हा आपोआप बरा होतो आणि त्यासाठी औषध घेण्याची गरज भासत नाही. खोकला-सर्दीवर उपचार म्हणून सर्वप्रथम विश्रांती घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि इतर सहाय्यक घरगुती उपाय अवलंबणे आवश्यक आहे.
मंत्रालयाने सर्व सरकारी व खासगी रुग्णालये तसेच क्लिनिक यांना निर्देश दिले आहेत की, मुलांना फक्त GMP (Good Manufacturing Practices) अंतर्गत तयार केलेल्या दर्जेदार औषधांचाच वापर करावा. तसेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरचे काटेकोर पालन करण्यावरही भर देण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार –
-दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप व सर्दी-खोकल्याची औषधे देऊ नयेत.
-पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ही औषधे सामान्यतः सुरक्षित मानली जात नाहीत.
-पाच वर्षांवरील मुलांना औषध डॉक्टरांच्या देखरेखीखाली, योग्य मात्रेत आणि मर्यादित काळासाठीच द्यावे.
या बरोबरच सरकारने पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांच्या खोकला-सर्दीवर तातडीने औषधांचा वापर न करता प्राथमिक घरगुती उपाय करावेत आणि गरज भासल्यासच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जेनेरिक खोकल्याच्या सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू –
आज अनेक प्रसार माध्यमांवर बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील एक धक्कादायक घटनेने पालकांचे धाबे दणाणले आहेत. जेनेरिक खोकल्याच्या सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे, तर अनेक मुले गंभीर आजारी पडली आहेत. या गंभीर प्रकरणानंतर ड्रग कंट्रोलर विभागाने तातडीने कारवाई करत Dextromethorphan Hydrobromide Syrup IP 13.5 mg/5 ml या औषधाच्या 20 हून अधिक बॅचवर बंदी घातली आहे.
या सिरपचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, राजस्थान सरकारने तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यापूर्वीही मध्यप्रदेशातील छिंदवाडामध्ये अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या होत्या, ज्यामुळे या औषधाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





